पराभूत उमेदवारांचा शृंगारतळीत सत्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

‘‘पराभूत झालो म्हणून घरी शे-पाचशे माणसे येऊन गेली. त्याचवेळी निराशा झटकून टाकली. आपण चांगले काम करीत राहायचे याचा निर्णय घेतला. आज शृंगारतळीतील ग्रामस्थांनी पक्षभेद विसरून सत्कार केला, हीच आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची श्रीमंती आहे.’’ 
- संजय पवार

गुहागर- निकालानंतर जिंकलेल्यांचे सत्कार तर सर्वत्र होतात; परंतु हरलेल्या उमेदवाराचाही खुलेआमपणे सत्कार होतोच असे नाही. शृंगारतळी बाजारपेठेतील नागरिकांनी अंजनवेल गटात राष्ट्रवादीला टक्कर देणारे सुरेश सावंत आणि पाटपन्हाळे गणात निसटता पराभव झालेले उपसरपंच संजय पवार यांचा सत्कार थेट रस्त्यावरच केला. त्यामुळे पराभवाचे दु:ख कमी झालेच, शिवाय आजही आपल्यापाठी जनता आहे, याचे समाधानही या दोघांना मिळाले. 

रत्नागिरी जिल्ह्यात कुठेच कमळ फुलले नाही. त्यामुळे गुहागरमधील भाजप कार्यकर्त्यांचे पराभवाचे शल्य किंचित कमी होण्यास मदत झाली. माणूस दु:खातही सुख शोधत असतो. सुरेश सावंत नसते तर एवढी झुंज अन्य कोणीच देऊ शकले नसते अशी पोस्ट कोणीतरी सोशल मीडियावर टाकली आणि भाजपचा कार्यकर्ता हसला. या सोशल ग्रुपवर याच विषयाची चर्चा सुरू झाली. पराभवाच्या वेदनांचे दु:ख हलके झाले. आपण पुन्हा अधिक मेहनत घेऊ. यश येईपर्यंत गप्प बसायचे नाय, अशा संदेशातून हिंमतही देण्याचा प्रयत्न झाला. पाटपन्हाळे गणातून शिवसेनेचे उमेदवार असलेले संजय पवार यांचा केवळ १९२ मतांनी पराभव झाला. कोणत्याही नेत्याचे पाठबळ नाही. प्रचाराची साधनसामग्री नाही या स्थितीतही संजय पवार यांनी प्रचार केला. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेली कामे हाच संजय पवारांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू होता. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संजय पवारांचे नाव विजयी उमेदवारांच्या संभाव्य यादीत होते; मात्र प्रत्यक्ष निकालात त्यांचा पराभव झाला. त्यांचेही दु:ख हलके करण्याचा प्रयत्न या सर्वांवर कडी केली ती शृंगारतळीतील जनतेने. आज सकाळी शृंगारतळी बाजारपेठेतील काही व्यापारी, प्रतिष्ठित ग्रामस्थ यांनी थेट सुरेश सावंत व उपसरपंच संजय पवार यांचा सत्कारच केला. यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांबरोबर सामान्य जनतेची उपस्थिती लक्षणीय होती. हा सत्कार करताना आपण प्रत्यक्षात विजयी झाला नसलात तरी विजय तुमचाच आहे असे सावंत आणि पवारांना सर्वांनी सांगितले. कोणत्याही सभागृहात किंवा दुकानात हा कार्यक्रम झाला नाही. विजयी उमेदवाराप्रमाणेच सावंत आणि पवार आल्यावर फटाके फोडण्यात आले. रस्त्यावरच हार घालून सत्कार करण्यात आला. 

‘‘पराभूत झालो म्हणून घरी शे-पाचशे माणसे येऊन गेली. त्याचवेळी निराशा झटकून टाकली. आपण चांगले काम करीत राहायचे याचा निर्णय घेतला. आज शृंगारतळीतील ग्रामस्थांनी पक्षभेद विसरून सत्कार केला, हीच आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची श्रीमंती आहे.’’ 
- संजय पवार

Web Title: Defeated candidates honored