डिंगणेत चुकीच्या पद्धतीने आणेवारी टाकल्याने शेतकऱ्यांनी दिलाय `हा` इशारा

Demand For Land Reclamation Repair In Dingane Sindhudurg Marathi News
Demand For Land Reclamation Repair In Dingane Sindhudurg Marathi News

बांदा ( सिंधुदुर्ग ) - डिंगणे येथील गट क्रमांक 716 या सामाईक क्षेत्रात चुकीच्या पद्घतीने आणेवारी टाकून काही शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी केले आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता परस्पर हे क्षेत्र कमी करुन सातबारामध्ये चुकीच्या पद्घतीने नोंद केली आहे.

याबाबत सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी बांदा मंडळ अधिकाऱ्यांना दुरूस्तीचे आदेश दिले होते; मात्र अद्यापपर्यंत कार्यवाही न झाल्याने संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. बांदा मंडळ अधिकारी व डेगवे तलाठी यांची चौकशी करावी, सातबारा दुरूस्ती करुन मिळावा, अशी मागणी भास्कर सावंत व हिस्सेदार शेतकऱ्यांनी केली आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की, डिंगणे येथील गट क्रमांक 716 या सामाईक क्षेत्रात महसूलच्या यंत्रणेने शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी केले आहे. त्याची नोंद सातबारात चुकीच्या पद्घतीने केली आहे. एकूण क्षेत्र व भोगवटदारांच्या नावासमोरील क्षेत्राची बेरीज जुळत नाही. या क्षेत्रात दुरूस्ती करण्याचे आदेश सावंतवाडी तहसिलदारांनी दिले होते. हे कारण दाखवून कायद्याच्या चौकटीत न बसणारे आकारफोड पत्रक जोडून चुकीच्या पद्घतीने आणेवारी टाकून क्षेत्र कमी केल्याचा आरोपही निवेदनात संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे. 

कार्यवाहीसाठी अधिकाऱ्यांची टाळाटाळ 
सामाईक गट क्रमांक 716 मध्ये केलेले फेरबदल लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सावंतवाडी तहसीलदार म्हात्रे यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले. तहसीलदारांनी शहानिशा करुन दुरूस्ती करण्याचे आदेश बांदा मंडळ अधिकाऱ्यांना दिले; मात्र कार्यवाही करण्यात मंडळ अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, चुकीच्या पद्घतीने झालेल्या बदलांची दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा उपोषण छेडण्याचा इशाराही या निवेदनातून दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com