राणेंच्या खासदारकीचा निर्णय भाजप श्रेष्ठींकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

रत्नागिरी - ‘भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेची खासदारकी दिलेले नारायण राणे हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. त्यांची खासदारकी काढून घ्या, अशी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षांनी केलेली तक्रार वरिष्ठांपुढे मांडली आहे. भाजप श्रेष्ठी त्यावर निर्णय घेतील,’ अशी माहिती भाजपचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी दिली.

रत्नागिरी - ‘भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेची खासदारकी दिलेले नारायण राणे हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. त्यांची खासदारकी काढून घ्या, अशी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षांनी केलेली तक्रार वरिष्ठांपुढे मांडली आहे. भाजप श्रेष्ठी त्यावर निर्णय घेतील,’ अशी माहिती भाजपचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी दिली.

तसेच उमेदवार जाहीर करण्याचे अधिकार कोअर कमिटीला असून, चिपळूण व राजापूरमधील उमेदवारीबाबत आलेल्या वृत्तांची माहिती जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्याकडून घेऊ, असे त्यांनी सांगितले. रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, की माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले. त्यांनी भाजपवर टीका करणे योग्य नाही. त्यांनी केलेली टीका माझ्या वाचनात आलेली नाही. प्रमोद जठार यांनी राणेंची खासदारकी परत घेण्याची मागणी केली आहे. तो प्रस्ताव वरिष्ठांपर्यंत पोचविला आहे. त्यावर निर्णय घेतला जाईल. खासदार राणे अनुभवी व ज्येष्ठ नेते आहेत. ते भाजपवर टीका करणार नाहीत, माजी खासदार नीलेश राणे यांनी भाजप जिल्हाध्यक्षांवर केलेल्या टीकेचा मी निषेध करतो. टीका सहन करण्याची क्षमता प्रत्येकाने ठेवली पाहिजे. त्यासाठी हीन पातळीवर उतरू नये. कोकणला मधू दंडवतेंसारख्या नेत्यांची पार्श्‍वभूमी लाभली आहे. याबाबत मी नीलेश यांच्याशी बोलेन आणि तसे न करण्याची विनंतीही करेन.

बाळ माने आणि उल्का विश्‍वासराव यांच्या उमेदवारीबाबत आलेल्या बातम्यांचे खंडन करताना लाड म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे उमेदवार निश्‍चित करून ते जाहीर करण्याचे अधिकार कोअर कमिटीला आहेत. प्रत्येक जण इच्छा व्यक्त करू शकतो; परंतु मी तेथे उभा राहीन असे होत नाही. तसा गैरसमज कुणी करून घेतला असेल तर तो योग्य नाही. उमेदवारीबाबत आलेल्या बातम्यांची माहिती बाळ माने यांच्याकडून घेणार आहे. त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क झालेला नाही.

युती झाल्यास रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये तीन किंवा चार जागा भाजपला मिळाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न राहील; परंतु युती न झाल्यास कोकणात स्वतंत्रपणे लढण्यास भाजप समर्थ आहे, असे आमदार लाड यांनी सांगितले.

Web Title: demand of MP Narayan Rane resignation