आंबा घाट दुरुस्तीसाठी अडीच कोटींची मागणी 

आंबा घाट दुरुस्तीसाठी अडीच कोटींची मागणी 

रत्नागिरी - कोल्हापूर-रत्नागिरीला जोडणाऱ्या आंबा घाटाला ढगफुटीचा फटका बसला आहे. रस्त्याला मधोमध भेगा गेल्या असून अशी घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती. प्रमाणापेक्षा अधिक पडलेल्या पावसाचे पाणी आतमध्ये मुरुन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. हा मार्ग सुरळीत करण्यासाठी कोसळलेल्या भागाचा भराव मातीने भरणे, रुंदीकरण, बाजूपट्टीचे खडीकरण आणि रस्ता डांबरीकरणासाठीचा अडीच कोटीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाला पाठवला आहे. 

ऑगस्टच्या पहिल्या दिवसापासून पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणात ढगफुटीसारखा पाऊस कोसळत आहे. त्याचा फटका आंबा घाटातील रस्त्यांना बसला आहे.घाटातील शंभर मिटर रस्त्याचा दरीकडील भाग खचला असून रस्त्याच्या मधोमध भेगाही पडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी घाटात रस्ता रुंदीकरण केले होते. त्याठिकाणच्या बाजूपट्टीकडील माती कोसळली. सध्या घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे.

दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी खचलेल्या भागाच्या विरुद्ध बाजूला काही मीटरचा भाग शिल्लक आहे. तो मजबूत करून डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्या बाजूला सुरक्षेसाठी संरक्षक भिंतही बांधण्याचा विचार सुरू आहे. तसे केल्यास त्या परिसरातील रस्ता 9 मीटर होईल. रस्त्याला गेलेल्या भेगांवर तात्पुरत्या उपाययोजना म्हणून सिंलींग केले आहे. पाऊस गेल्यानंतर दिवाळीत बाजूपट्टीकडील भागाचे डांबरीकरण करून दुहेरी मार्ग सुुरु केला जाणार आहे. त्यासाठी अडीच कोटीचा निधी आवश्‍यक आहे.तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. सुरक्षेसाठी आंबा घाटातील या धोकादायक भागावर बांधकाम विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. 
 
भूगर्भातील हालचालींवर संशोधन 
पावसानंतर आंबा घाटातील नादुरुस्त भागात घडलेल्या भूगर्भातील हालचालींचा हा परिणाम असावा,असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. बांधकाम विभागाच्या रस्ता सुरक्षा समितीमधील तज्ज्ञांकडून यावर संशोधन केले जाणार आहे. आंबा घाटात पडलेल्या भेगा किती खोलवर आहेत याचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पावसाळा संपला की कायमस्वरुपी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल,असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com