esakal | अतिक्रमणाबाबत प्रशासनाला इशारा, जाणून घ्या नेमके प्रकरण!
sakal

बोलून बातमी शोधा

 Demand for removal of encroachment konkan sindhudurg

पण त्याकडे दुर्लक्ष करून आता त्या व्यक्तीने वहिवाटीतील जागेत कुंपण आणि गेट घातले. ते कुंपणसुद्धा सौर ऊर्जेचे आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना धोका पोचू शकतो.

अतिक्रमणाबाबत प्रशासनाला इशारा, जाणून घ्या नेमके प्रकरण!

sakal_logo
By
प्रभाकर धुरी

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - तिलारी शेटवेवाडी येथील वहिवाटीच्या जागेत एका व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. त्याबाबत तहसीलदार व अन्य संबंधित कार्यालयांकडे लेखी तक्रार करूनही त्यांनी दखल घेतलेली नाही. त्याबद्दल शंकर रामचंद्र शेटवे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

तिलारी शेटवेवाडी येथे तिलारी विश्रामगृहाशेजारील गणपती मंदिराच्या बाजूला संबंधित व्यक्तीने जमीन घेतली आहे. ती जमीन घेतानाच वहिवाटीतील रस्ता कायम खुला ठेवण्याची अट घातली होती. ते त्यांनी मान्य केले होते; पण त्याकडे दुर्लक्ष करून आता त्या व्यक्तीने वहिवाटीतील जागेत कुंपण आणि गेट घातले. ते कुंपणसुद्धा सौर ऊर्जेचे आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना धोका पोचू शकतो.

त्याने केलेल्या अतिक्रमणाबाबत श्री. शेटवे यांनी तहसीलदार यांच्याकडे 30 जानेवारीला तक्रार अर्ज केला होता. त्याला सहा महिने होत आले तरीही कुणीच साधी चौकशीही केलेली नाही. त्यामुळे श्री. शेटवे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वहिवाटीच्या जागेत केलेले अतिक्रमण न हटवल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

संबंधित व्यक्ती कंपनीच्या नावावर अतिक्रमण करत आहेच, शिवाय बेकायदा जिलेटिन स्फोटही घडवून आणत आहे, अशी माहिती ब्रह्मानंद शेटवे यांनी दिली. वेळीअवेळी होणाऱ्या बेकायदा स्फोटामुळे घराला हादरे बसत असल्याने या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

संपादन - राहुल पाटील
 

loading image
go to top