कोणी केली मालवण नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

निवेदनात म्हटले आहे की, पालिकेत नगराध्यक्षांनी कर्मचाऱ्यामार्फत लाच स्वीकारली. याचे पुरावे आमच्याकडे असून आम्ही ते यापूर्वीच सादर केले आहेत. नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा अन्यथा त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी,

मालवण ( सिंधुदुर्ग ) - ठेकेदाराकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी 3 डिसेंबरपर्यंत राजीनामा द्यावा अथवा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, अन्यथा 4 डिसेंबरपासून येथील पालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडू, असा इशारा सत्ताधारी गटाचे नेते गणेश कुशे व माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

हेही वाचा -  नरडवे प्रकल्पग्रस्तांनी मुंबईतील बैठकीत का केला विरोध ? 

निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यावर सुदेश आचरेकर, गणेश कुशे, पूजा करलकर, परशुराम लुडबे, पूजा सरकारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, पालिकेत नगराध्यक्षांनी कर्मचाऱ्यामार्फत लाच स्वीकारली. याचे पुरावे आमच्याकडे असून आम्ही ते यापूर्वीच सादर केले आहेत. नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा अन्यथा त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करून आठ दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. वास्तविक नगराध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून तत्काळ चौकशी समिती नेमून चौकशी सुरू करावी, अन्यथा 4 डिसेंबरपासून पालिकेसमोर उपोषण छेडणार आहोत.

हेही वाचा - धक्कादायक ! कोकण रेल्वे तिकीटांचा काळ्या बाजार 

उपोषणाच्या इशाऱ्यास तालुका भाजपचा पूर्ण पाठिंबा

या निवेदनाची प्रत तहसीलदार, पोलिस निरीक्षक, मुख्याधिकऱ्यांना देण्यात आली आहे. नगराध्यक्षांनी केलेला कथित आर्थिक भ्रष्टाचार नगरसेवकांनी सबळ पुराव्यासह जनतेसमोर आणला. त्याबाबतची तक्रार व पुरावे सादर करून आठ दिवस उलटले तरी कोणतेही चौकशी समिती नेमली गेली नाही. त्यामुळे चौकशी पारदर्शक होईल, याविषयी शंका वाटते. तरी याप्रकरणातील नगराध्यक्ष यांचे तत्काळ निलंबन करून चौकशी समिती नेमावी, या मागणीसाठी नगरसेवकानी दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्यास तालुका भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे. याबाबत कारवाई न झाल्यास भविष्यात आम्हाला मोठे आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर व अशोक तोडणकर यांनी दिला आहे. दरम्यान नगराध्यक्षांनी हे आरोप या आधीच फेटाळले आहेत. या प्रकरणी सादर केलेले व्हिडीओ व इतर पुरावे तंत्रज्ञानाचा वापर करुन फेरबदल केलेले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand Of Resignation Of Malvan City President