जिल्ह्यात 500 कोटींचे व्यवहार ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नोटाबंदीमुळे बॅंकांमधील सर्व व्यवहार बंद आहेत. फक्त नोटा घेणे आणि बदलून देण्याचे काम सुरू आहे. 9 तारखेपासून कर्जासह बॅंकांचे सुमारे 500 कोटींचे व्यवहार थांबले आहेत. जिल्ह्यातील 32 बॅंकांची एटीएम सोमवारपासून सुरू होण्याची शक्‍यता आहे.

रत्नागिरी : केंद्र शासनाने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे जिल्ह्यात आर्थिक अराजक माजले आहे.

स्वत:च्या खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी खातेदार रांगा लावत आहेत. 9 तारखेपासून आजपर्यंत बॅंकांचे सुमारे 500 कोटींचे इतर व्यवहार ठप्प झाले आहेत. ही आर्थिक चणचण भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बॅंकांनी 677 कोटी रुपयांची मागणी 'आरबीआय'कडे केली आहे. दोन दिवसांत त्यापैकी काही रक्कम मिळण्याची शक्‍यता आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार सुरळीत होण्याची शक्‍यता बॅंक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

नोटांवरील बंदीमुळे गेला आठवडाभर जिल्ह्यातील बॅंका, एटीएम, पोस्ट या ठिकाणी रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत. लोक भुकेले राहून सुट्ट्या पैशांसाठी उन्हातान्हात उभे राहात आहेत. जिल्ह्यातील बॅंकांची आजवर काय आर्थिक स्थिती आहे, याबाबत बॅंक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक श्री. बांदिवडेकर यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, ''जिल्ह्यात साधारण सर्व बॅंकांचे मिळून 250 एटीएम आहेत. त्यापैकी 150 आमच्या बॅंकेची आहेत. बॅंक ऑफ इंडियाच्या एकूण 99 एटीममधून 2000 ची नोट आता मिळू शकेल. त्यापैकी 10 एटीएम आज सुरू झाली आहेत. तांत्रिक दुरुस्ती करून 2 हजारांची नोट आता ग्राहकांना मिळणार आहे. दोन दिवसांत उर्वरित सर्व एटीएम सुरू होण्याची अपेक्षा आहे. शासनाकडून 2000 नोटा आल्या आहेत. 500 च्या नव्या आणि 100 च्या नोटा अद्याप आलेल्या नाहीत. जिल्ह्यातील सर्व बॅंकांनी आरबीआयकडे 677 कोटी रुपयांची मागणी केली आहे. येत्या दोन दिवसांत त्यापैकी काही रक्कम प्राप्त होईल. ही रक्कम मिळाल्यास साधारण सोमवारपासूून बॅंकांमधील सर्व आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येतील.'' 

नोटाबंदीमुळे बॅंकांमधील सर्व व्यवहार बंद आहेत. फक्त नोटा घेणे आणि बदलून देण्याचे काम सुरू आहे. 9 तारखेपासून कर्जासह बॅंकांचे सुमारे 500 कोटींचे व्यवहार थांबले आहेत. जिल्ह्यातील 32 बॅंकांची एटीएम सोमवारपासून सुरू होण्याची शक्‍यता आहे. नोटांवर घातलेल्या बंदीमुळे आजवर सर्व बॅंकांमध्ये 500 व 1000 च्या नोटा बदलण्यासाठी सुमारे 200 कोटी रुपये जमा झाले असावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

Web Title: demonetization hits Ratnagiri hard; 500 Cr transactions affected