डेरवणचा पाझर तलाव २५ गावांचा तारणहार 

प्रकाश पाटील
मंगळवार, 25 एप्रिल 2017

सावर्डे - कोकणात उन्हाळ्याला सुरवात झाल्यानंतर सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. चिपळूण तालुक्‍यातील सावर्डे परिसरातील गावांना डेरवण-राजेवाडी पाझर तलाव तारणहार ठरला आहे. शेतकऱ्यांची शेती बारमाही फुलू लागली आहे. १९९९ ला युती शासनाच्या काळात डेरवण-राजेवाडी येथील तलावाला मंजुरी मिळाली होती. त्याचा फायदा २५ हून अधिक गावांना झाला असून येथील पाणीटंचाईचा प्रश्‍न कायमचा प्रश्‍न मिटला आहे. रत्नागिरी जिल्हा ग्रामविकास व जलसंधारण विभाग पाटबंधारे स्थानिकस्तर विभागाच्या यांच्या अधिपत्याखाली महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला गेला.

सावर्डे - कोकणात उन्हाळ्याला सुरवात झाल्यानंतर सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. चिपळूण तालुक्‍यातील सावर्डे परिसरातील गावांना डेरवण-राजेवाडी पाझर तलाव तारणहार ठरला आहे. शेतकऱ्यांची शेती बारमाही फुलू लागली आहे. १९९९ ला युती शासनाच्या काळात डेरवण-राजेवाडी येथील तलावाला मंजुरी मिळाली होती. त्याचा फायदा २५ हून अधिक गावांना झाला असून येथील पाणीटंचाईचा प्रश्‍न कायमचा प्रश्‍न मिटला आहे. रत्नागिरी जिल्हा ग्रामविकास व जलसंधारण विभाग पाटबंधारे स्थानिकस्तर विभागाच्या यांच्या अधिपत्याखाली महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला गेला. ४६० मीटर लांबी, ३०.८० मीटर उंची असलेल्या तलावाचे पाणलोट क्षेत्र ४.७९ चौरस किमी आहे. सांडवा लांबी ५४.०० मीटर, संचय पातळी १५४ मीटर तर बुडीत क्षेत्र ३९.४८ मीटर, तर एकूण पाणीसाठा ३.२३ दक्षलक्ष घनमीटर इतका आहे. यामुळे परिसरातील १८३ हेक्‍टर जमीन ओलिताखाली आली आहे. दरवर्षी ३.२३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा पूर्णक्षमतेने भरला जातो. 

सावर्डे परिसरातील डेरवण, कासारवाडी, सुतारवाडी, उगेदवाडी, सावर्डेच्या बारा वाड्या, भुवडवाडी दहिवली, आगवे, मांडकी बुद्रुक, खुर्द, पालवण, ढोक्रवली, कोंडमळ्याच्या बारा वाड्या दहिवली, खरवते, आबिटगाव, तुरंबव, कुडप आदी गावांतील अनेक विहिरी तसेच कूपनलिकेची भूजल पातळी वाढली आहे. हा प्रकल्प होण्याअगोदर १९९९ पूर्वी सावर्डे परिसरात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य होते. आंबतखोल धरणातून सावर्डेसारख्या ठिकाणी पाणी आणले जात होते. मात्र, १९९९ नंतर पाणीटंचाई कायमचा पूर्णविराम मिळाला. डेरवणच्या तलावाने खऱ्या अर्थाने सावर्डे परिसराचा कायापालट केला आहे. 

डेरवण तलाव्याच्या पायथ्याशी लिली, झेंडू, गलाटा, निशिगंध सारख्या फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची फुलशेती फुलू लागली आहे. तसेच मांडकी, आगवे, तुरंबव येथे तरारलेल्या केळी, कलिंगड, आंबा, नारळ, अननस आदी फळशेतीचे उत्पादन वाढत चालले आहे. मांडकी , पालवण, ढोक्रवली येथील शेतकऱ्यांनी ग्रीन हाउस उभारले आहे. 

कोकणात जलसंवर्धन काळाची गरज आहे. हरितक्रांती घडवायची असेल, तर दऱ्याखोऱ्यामध्ये छोटे-छोटे बंधारे बांधले पाहिजेत. राज्य शासनाने पाझर तलावाबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावेत. कोकणात असे बंधारे झाल्यास जलक्रांती होईल. 
- शेखर निकम, सावर्डे

Web Title: Dervan Percolation Pond