देवबागात स्मशानभूमी गिळकृंत करण्याचा प्रकार 

देवबागात स्मशानभूमी गिळकृंत करण्याचा प्रकार 

मालवण - समुद्री तसेच खाडीतील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्‍यातील देवबाग गावात पर्यटन वाढत चालले आहे. एकीकडे ही बाब चांगली असली तरी दुसरीकडे या वाढत्या पर्यटनामुळेच गावातील एकमेव स्मशानभूमी गिळकृंत करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे देवबाग सध्या स्मशानभूमीविना असे म्हणण्याची वेळ आली आहे. या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पर्यटन व्यावसायिकाकडून स्थानिक मच्छीमारांच्या हक्कांवर गदा आणली जात असल्याने मच्छीमारही संतप्त बनले आहेत. याप्रकरणी संबंधित पर्यटन व्यावसायिकास ग्रामपंचायतीच्या वतीने नोटीस बजावली आहे. 

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या तारकर्ली पाठोपाठ देवबाग गावचाही पर्यटनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात झपाट्याने विकास होत आहे. वाढत्या पर्यटकांमुळे गावात पर्यटनविषयक अनेक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटनातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत असून राहणीमानातही चांगला बदल झाला असल्याचे दिसून येत आहे. देवबाग गावातील मोबारवाडी ही दरवर्षी पावसाळ्यात समुद्री अतिक्रमणाच्या तडाख्यात सापडत होती. मोबारवाडीचा बराचसा भाग पावसाळ्यात समुद्र गिळंकृत करत असल्याने देवबागची ही वाडीच नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती. एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र अशा कात्रीत सापडलेला या गावातील रहिवाशांना पावसाळ्यात जीव मुठीत धरूनच वास्तव्य करावे लागत होते. स्थानिकांचे मासेमारी हेच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने प्रशासनाकडून स्थलांतराच्या नोटिसा बजावल्यानंतर स्थानिक वास्तव्याच्या अन्यत्र सोय होत नसल्याने त्याचठिकाणी वास्तव्य करत होते. 

पावसाळ्यात या गावास सागरी अतिक्रमणाचा तडाखा बसत असल्याने शासनाने या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा घालण्याची मागणी स्थानिकांनी लावून धरली होती. यात मोबारवाडीचा बराचसा भाग समुद्र गिळंकृत करत असल्याने या ठिकाणी बंधारा घालण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती. याच मोबारवाडीत गावची स्मशानभूमी असल्याने तीही पावसाळ्यात समुद्र गिळंकृत करत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती. त्यामुळे काही वर्षापूर्वी खाडी किनाऱ्याच्या बाजूने जिओ ट्यूब तसेच समुद्राच्या बाजूने धूप प्रतिबंधक बंधारा घालण्यात आला. या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात होणारी धूप थांबल्याने मोबारवाडीचा धोका टळला. याच ठिकाणी असलेली स्मशानभूमीही गेली काही वर्षे या बंधाऱ्यामुळे टिकून राहिली. 

देवबाग गावात मोबारवाडीतच एकमेव स्मशानभूमी अस्तित्वात आहे. पूर्वी मोबारवाडीतील हे क्षेत्र हे बुडीत क्षेत्र होते. स्थानिकांच्या नावे ही जमिन असली तरी हा भाग पावसाळ्यात समुद्रात जात असल्याने या ठिकाणी काहीही नव्हते; मात्र बंधाऱ्यामुळे या ठिकाणी पुन्हा जमीन तयार झाली आणि आता या ठिकाणी पर्यटन व्यवसाय वाढू लागले आहेत; मात्र या वाढत्या पर्यटनाचा फटका गावातील एकमेव स्मशानभूमीस बसला आहे. सद्यस्थितीत देवबाग गाव स्मशानभूमीविना असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बंधाऱ्यामुळे जी जमीन तयार झाली ती जमीन खासगी असल्याने त्या ठिकाणी एका व्यावसायिकांने आपला पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने या ठिकाणी स्मशानभूमी असल्याने त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग खुला ठेवण्यात यावा अशा आशयाचे पत्र संबंधित व्यावसायिकास पाठविण्यात आले आहे. गावातील ही स्मशानभूमीच नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने ग्रामस्थांना तारकर्ली येथील पाच किलोमीटर अंतरावरील स्मशानभूमीच्या ठिकाणी जावे लागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. शिवाय मोबारवाडीच्या ठिकाणी स्थानिक मच्छीमार आपला मासेमारीचा व्यवसाय करत असल्याने ते याच ठिकाणाहून आपल्या होड्या समुद्रात लोटतात. या स्थानिकांना त्या पर्यटन व्यावसायिकांकडून अडवणूक केली जात असल्याने मच्छीमारांच्या हक्कावर गदा आली आहे. मोबारवाडीतील ज्या जागेत स्मशानभूमी आहे त्याची नोंद सातबारामध्ये आहे. शिवाय या ठिकाणी शासनाच्या वतीने बंधाऱ्यासाठी खर्च करण्यात आलेला आहे. आता याच परिसरात पर्यटनाच्या नावाखाली अतिक्रमण होत असताना महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. 

देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांच्याशी संपर्क साधला असता देवबाग मोबारवाडी येथे पूर्वीपासूनच स्मशानभूमी अस्तित्वात होती; मात्र हा भाग पावसाळ्यात समुद्रात जात असल्याने ग्रामस्थांची गैरसोय व्हायची. मात्र त्या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा तसेच जिओ ट्युबचा बंधारा घातल्यानंतर मोठ्या प्रमाणात होणारी धूप थांबली असून चांगली भाट पडून जमीन तयार झाली आहे. या ठिकाणी पर्यटन व्यवसाय वाढू लागला आहे. मात्र मोबारवाडीतील स्मशानभूमीकडे जाणारी वाट कायमस्वरूपी सुरू राहावी यासाठी संबंधित व्यावसायिकास नोटीस बजावण्यात आली आहे. प्रत्यक्षात मोबारवाडीतील जमीन पावसाळ्यात कायम समुद्रात जात असल्याने ती जमीन महसूल प्रशासनाने कायमस्वरूपी खालसा करणे आवश्‍यक होते. मात्र महसूल विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही समस्या निर्माण झाली आहे. महसूल विभागाबरोबर मेरीटाईम बोर्डाचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, यासंदर्भात स्थानिक तलाठी श्री. साईल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

देवबाग गावात मोबारवाडी येथे एकमेव स्मशानभूमी आहे. याच ठिकाणी आता पर्यटन व्यवसाय सुरू करण्यात आल्याने गावची अवस्था स्मशानभूमीविना गाव अशी झाली आहे. मोबारवाडीच्या याच भागात स्थानिक मच्छीमार मासेमारीचा व्यवसाय करत असून त्यांचा होड्या लोटण्याचा तसेच ये-जा करण्याचा हाच मार्ग आहे. मात्र सध्या एका पर्यटन व्यावसायिकांकडून त्यांना अडविले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांचे हक्कावर आपण गदा येऊ देणार नाही. आपण स्थानिक मच्छीमारांच्या पाठीशी राहणार आहे. तसेच गावातील एकमेव स्मशानभूमी त्याचठिकाणी राहावी यासाठीही प्रयत्नशील राहणार आहे. 
- हरी खोबरेकर, सदस्य, जिल्हा परिषद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com