जिल्हा परिषदेद्वारे सर्वांगीण विकास - नीतेश राणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

मालवण - राज्यात कॉंग्रेसविरोधात लाट असतानाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील जनतेने कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करत संपूर्ण जिल्हा हा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे दाखवून दिले आहे. भराडीदेवीच्या आशीर्वादाने येत्या काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल, अशी ग्वाही कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी आज आंगणेवाडी येथे दिली. 

आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रेनिमित्त आमदार नीतेश राणे यांनी आंगणेवाडीस भेट दिली. त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी भराडीचे दर्शन घेतले. त्यानंतर कॉंग्रेस कार्यालयात तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राणे म्हणाले, ""भराडीदेवीच्या आशीर्वादामुळेच गेली काही वर्षे राणे कुटुंबीयांस यश मिळाले आहे. देवीच्या कृपाशीर्वादामुळे राणेंना राज्यात विविध पदे मिळाली. राज्यात कॉंग्रेसविरोधी लाट आहे, त्यामुळे त्याचा फटका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसने एकहाती सत्ता मिळविण्यात यश मिळविले आहे. कॉंग्रेसविरोधात लाट असतानाही जनतेने कॉंग्रेस उमेदवारांना विजयी करत राणेंच्या पाठीशी असल्याचे दाखविले आहे. जिल्ह्यातील जनतेचा मी आभारी आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यास कॉंग्रेस कटिबद्ध राहील.'' 

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसची भूमिकाच निर्णायक राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात्रेनिमित्ताने ज्या भाविकांना आधारकार्ड काढता आली नाहीत अशांसाठी आंगणेवाडीत मोफत आधारकार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेचे उद्‌घाटनही आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी कॉंग्रेस कार्यालयाच्या ठिकाणी गर्दी केल्याचे चित्र होते. आज व उद्या अशी दोन दिवस ही सुविधा कार्यरत राहणार आहे. 

Web Title: The development by the District Council