esakal | मालवण शहर विकास आराखड्यावरून हमरातुमरी

बोलून बातमी शोधा

Development plan Dispute in Malvan

शहर विकास आराखडा रद्द करावा, या मागणीसाठी आज पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांना भूमिका मांडायला देण्यावरून वाद निर्माण झाला. यातून वादावादी आणि नंतर हमरातुमरी झाल्याने काही काळ तणाव पसरला होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने यावर पडदा पडला. 

मालवण शहर विकास आराखड्यावरून हमरातुमरी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) - शहर विकास आराखडा रद्द करावा, या मागणीसाठी आज पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांना भूमिका मांडायला देण्यावरून वाद निर्माण झाला. यातून वादावादी आणि नंतर हमरातुमरी झाल्याने काही काळ तणाव पसरला होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने यावर पडदा पडला. 

शहर विकास आराखडा रद्दच्या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा निघाला. पालिकेच्या प्रवेशद्वारावर मोर्चा आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी निवेदन स्विकारण्यास आलेल्या नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना बोलण्यास मोंडकर यांनी अटकाव केला. त्यातून तणाव निर्माण झाला. शिवसेना नगरसेवकांनी नगराध्यक्षांची बाजू मांडली.

नागरिकही नगराध्यक्षांनी बोलावे, अशी भूमिका मांडत होते; मात्र मोंडकर यांनी नगराध्यक्षांनी बोलूच नये, असे सांगितल्यानंतर वादावादी झाली. त्यातून हमरातुमरी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दी बाजूला केली. मोर्चेकरांनी आणलेला रिक्षा स्पीकर बंद केला. 
माजी नगराध्यक्ष आचरेकर यांच्या आवाहनानुसार शहर विकास आराखड्याबाबत मोर्चाचे नियोजन होते. यासाठी अरविंद मोंडकर यांच्यासह अन्य सदस्यांची जनजागृती कृती संघर्ष समितीची स्थापनाही केली.

मोर्चात सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन होते; प्रत्यक्षात मोर्चात भाजपचे पदाधिकारी अधिक तर मनसे व कॉंग्रेसचे ठराविक पदाधिकारी व सुमारे 200 नागरिक सहभागी होते. मोठा मोर्चा निघेल, असा अंदाज असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त होता. भरड दत्तमंदिर येथून सकाळी अकरा वाजता मोर्चा निघाला. बाजारपेठमार्गे पालिकेवर आला. 

तेथे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष निवेदन स्वीकारण्यस आले. त्यावेळी मोर्चेकऱ्यांनी आराखडा रद्द करा, अधिसूचना रद्द होणार काय, मुख्यमंत्र्यांना भेटलात काय, आदी प्रश्‍नांच्या फैरी झाडल्या. आचरेकर यांनी आराखड्याबाबत आक्रमक भूमिका मांडली. मोर्चासमोर नगराध्यक्ष कांदळगावकर आपली भूमिका मांडण्यास जात असतानाच श्री. मोंडकर यांनी 'नगराध्यक्ष, तुम्ही बोलू शकत नाही' असे सांगत तीव्र विरोध केला.

यावेळी नगरसेवक मंदार केणी, बांधकाम सभापती यतीन खोत, सेजल परब, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, पंकज सादये, सुनीता जाधव, गणेश कुडाळकर, तपस्वी मयेकर, बाबी जोगी, लारा देसाई यांनी मोंडकर हे मनमानी करत आहेत. नगराध्यक्ष बोलले तर वस्तुस्थिती समोर येईल, या भीतीनेच त्यांना बोलायला दिले जात नसल्याचा आरोप केला. 
नागरिकांनीही नगराध्यक्षानी बोलावे, अशी विनंती करूनही मोंडकर यांनी विरोधाची भूमिका घेतल्याने वाद वाढला. जोरदार शाब्दीक चकमक उडून तणावाचे वातावरण निर्माण झाले. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही झाला; मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांना बाजूला केले. त्यानंतर आचरेकर बोलत असलेला रिक्षा स्पीकर माईक बंद करण्यास सांगण्यात आले. 

मोंडकर यांनी मोर्चा दरम्यान नगराध्यक्षांना स्पीकरवर भूमिका मांडायला दिली नाही; मात्र नगराध्यक्षांनी मोर्चातील नागरिकांसमोर भूमिका मांडली. मी जनतेसोबतच असल्याचे सांगितले. शहर विकास आराखड्यात जे जे बदल नागरिकांना आवश्‍यक आहेत, ते ते बदल सूचना-हरकतीसह प्रभागात जाऊन स्वीकारल्या जातील. नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. मालवणवासीयांना न्याय देण्याचे काम मी शिवसेनेच्या व सरकारच्या माध्यमातून करेन, असे कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.