esakal | सावंतवाडीच्या रूपाने वसली राजधानी 

बोलून बातमी शोधा

Development of Sawantwadi as the capital of the city information by shivprasad desai}

 
खेम सावंत यांनी सावंतवाडी संस्थानला स्वतंत्र केल्यानंतर त्यांच्याकडे कुडाळ परगणा, बांदा, मणेरी, पेडणे, डिचोली आणि साखळी हे पाच महाल होते.

 

सावंतवाडीच्या रूपाने वसली राजधानी 
sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सिंधुदुर्ग : खेम सावंत यांच्या काळात खऱ्या अर्थाने सावंतवाडी संस्थानला स्वतंत्र असे स्वरूप आले. त्यांनीच सावंतवाडी शहराचा राजधानी म्हणून विकास केला. संस्थानचे ठाणे आताच्या राजवाड्याच्या ठिकाणी आणले. त्या काळात एका सुनियोजीत शहराची रचना त्यांनी केली. पोर्तुगिजांना शह देण्याबरोबरच बदलत्या परिस्थितीनुसार साताऱ्याच्या छत्रपतींशी जवळचे संबंध निर्माण केले. 
 
खेम सावंत यांनी सावंतवाडी संस्थानला स्वतंत्र केल्यानंतर त्यांच्याकडे कुडाळ परगणा, बांदा, मणेरी, पेडणे, डिचोली आणि साखळी हे पाच महाल होते. त्यावरून सावंत यांना "सरदेसाई परगणे कुडाळ व महालानिहाय' असे ओळखले जायचे. हे पाच महाल भिमगड या परगण्यात मोडत असत. भिमगड हा किल्ला आताच्या गोव्यातील साखळी भागामध्ये सह्याद्रीच्या शिखरावर होता. यावरून त्याचे नाव पडले होते. 

लखम सावंत यांच्या काळात नरेंद्र डोंगरावर सावंतवाडीचे ठाणे होते. खेम सावंत यांनी ते चराठा गावाच्या हद्‌दीतील आताचा राजवाडा असलेल्या ठिकाणी आणले. त्याला सुंदरवाडी असे नाव देण्यात आले. तेथे 1692 मध्ये राजवाडा बांधला. तो नवाकोट म्हणून ओळखला जावू लागला. नरेंद्रावर असलेल्या राजवाड्याला जुनाकोट म्हटले जायचे. यानंतर सावंतवाडीच्या विस्ताराला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. सुमारे पाऊण चौरस मैल इतक्‍या क्षेत्रफळात हे शहर वसवले गेले. 

शहर वसवण्यासाठी खेम सावंत यांनी कोणताही सारा न घेता लोकांना राहण्यासाठी मोफत जमिनी दिल्या. राजपुरोहित कोळंबेकर, शास्त्री देवस्थळी, पुराणीक जांभेकर, ताटकर आदींना राजवाड्याच्या जवळ वस्तीला ठेवले. पूर्वी सबनीस, चिटणीस व खासनीस असे तिनच दरकदार होते. त्याशिवाय जमाबंदीचे काम पाहण्यासाठी दप्तरदार रांगणेकर, खजिन्याच्या व्यवस्थेसाठी पोतनीस, पागेच्या देखरेखीसाठी पागनीस, सामानाच्या कोठीवर कोटणीस, तटाचे काम पाहण्यासाठी तटणीस, वारनिशीच्या कामासाठी फडणीस असे दरकदार त्यांनी नेमले.

 सैन्याच्या कामावरील मुख्याधिकारी राम दळवी हे सेनापती होते. शिवाय कानसावंत गुरबुटकर, मादसावंत कारिवडेकर, भोजसावंत व रूपसावंत माणगावकर आदी मराठा सरदार होते. या सगळ्यांची कामे वंश परंपरेने चालायची. शहरातील वाड्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण होती. लेखन स्वरूपाचे काम करणाऱ्यांसाठी सबनिसवाडा, खाते, सरदार यांचा खासकिलवाडा, व्यापारी वर्गाकरीता वैश्‍यवाडा, प्रामुख्याने सैनिकांसाठी सालईवाडा, राजवाड्यातील निधन झालेल्या व्यक्‍तींची माठी (स्मारके) असेल्या भागाला माठेवाडा, भिक्षूकी करणाऱ्या तसेच ब्राह्मणांसाठीच्या वाड्याला भटवाडी, कारागिरी किंवा तत्सम स्वरूपात फिरती कामे करणाऱ्यांसाठी बाहेरचा वाडा अशी रचना करून त्या आराखड्यानुसार शहरात वसाहत निर्माण केली गेली. यात राजवाडा केंद्रस्थानी राहील अशी रचना करण्यात आली. 

खेम सावंत यांच्या काळात बऱ्यापैकी स्थैर्य निर्माण झाले. असे असले तरी या भागावर प्रभाव असलेल्या राज्यकर्त्यांमध्ये बदलाचे वारे होते. लगतच्या गोव्यातून पोर्तुगीज सावंतवाडी संस्थानला त्रास देत होते. या भागात येवून ते लुटालुट व जाळपोळ करायचे. खेम सावंत यांनीही त्याला जशास तसे उत्तर दिले. तेही पोर्तुगिजांच्या प्रभाव क्षेत्रात घुसून वचक बसवत असत. 

या संघर्षातून काहीप्रमाणात अस्थितरता होती. 1703 मध्ये गोव्याचा पोर्तुगिज राजवटीचा गव्हर्नर जनरल असलेल्या कैतान डिमेलो याने सावंतवाडी संस्थानच्या प्रभावातील आमोणे किल्ल्यावर स्वारी करून तो उद्‌ध्वस्त केला. आणखी दोन वर्षांनी डिचोलीचा किल्लाही सर केला. 1706 मध्ये खोरजूवे आणि फोंडे ही बेटे ताब्यात घेतली. पुढे या गव्हर्नर जनरलने डिचोली आणि साखळीचा भागही आपल्या प्रभावाखाली आणला. यामुळे सौद्यांचा राजा पोर्तुगिजांचा मांडलीक झाला. त्यामुळे आताच्या गोव्याकडचा बराचसा भाग पोर्तुगिजांकडे गेला. 

खेम सावंत हे दिल्लीच्या बादशहाला महसूल देत नसत; मात्र त्यांची सत्ता पूर्ण जुगारून दिली नव्हती. अधूनमधून त्यांना मदत देण्याचा मुत्सदीपणा त्यांनी कायम ठेवला होता. 1706 च्या दरम्यान मोगलांचा सरदार सैय्यद गजफर अल्ली खान हा फोंडा येथील लष्कराचा प्रमुख होता. त्याला मदत देण्याचे काम दिल्लीच्या बादशहाने खेम सावंतांवर सोपवले होते. पुढे 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या सत्तेला उतरती कळा लागली. यानंतर खेम सावंत यांनी त्यांच्याशी असलेले संबंध जवळजवळ तोडून टाकले. 

यानंतर सावंत यांनी साताऱ्याच्या छत्रपतींशी जवळीक निर्माण केली. त्या काळात साताऱ्याच्या गादीवर राजाराम यांचे पूत्र शिवाजी हे होते. सर्व कारभार त्यांच्या आई ताराबाई पाहत असत. छत्रपती संभाजींचा मुलगा शाहू हे दिल्लीच्या कैदेत होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोअज्जीम हा गादीवर बसला. त्याने शाहू यांना बंधमुक्‍त केले. यानंतर शाहू यांनी राज्यावर हक्‍क सांगितला; मात्र ताराबाई यांनी ते मान्य केले नाही. तेव्हा शाहू यांनी काही सरदारांना आपल्या बाजूला वळवून ताकद निर्माण करायला सुरूवात केली. या काळात खेम सावंत यांनी शिवाजी यांच्या बाजूने आपले बळ देण्याची तयारी केली. 

रांगणा आणि पन्हाळा या किल्ल्यांच्या रक्षणासाठी त्यांनी मदत दिली. याच दरम्यान खेम सावंत यांनी विश्राम अनंत सबनिस आणि जीवाजी राम चिटणीस यांना शिवाजी यांच्याकडे पाठवून कुडाळ परगणा व पाच महाल वतनादाखल देण्याची विनंती केली. यानंतर शिवाजी यांनी आपल्या दोन अधिकाऱ्यांना खेम सावंत यांच्याशी चर्चेला पाठवले. त्यांची माणगाव येथे चर्चा होवून शिवाजी यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचे व शाहू राजांना मदत न करण्याचे त्यांनी कबूल केले. यानंतर 27 फेब्रुवारी 1708 ला कुडाळ परगणा आणि पंचमहाल त्यांना मोकळे करून देण्यात आले. शिवाय सावंतांचा बहुमान करण्यासाठी हत्ती, घोडा आदी पाठवून दिले. यावरून साताऱ्याच्या दरबारात खेम सावंत यांचे किती वजन होते हे लक्षात येते. 

तिकडे साताऱ्याच्या गादीसाठी सुरू असलेल्या संघर्षात शाहू राजांची सरशी झाली. काही दिवसांनी ते रांगणा गडावर आले होते. छत्रपतींशी एकनिष्ठेने वागण्याचे वचन खेम सावंत यांनी निश्‍चित केले होते. त्यामुळे छत्रपतींना भेटण्यासाठी पाटगाव येथे खेम सावंत यांनी आपले कारभारी पाठवले. छत्रपती शाहू महाराज यांनी सावंत यांना आपल्या राज्यकाळातही कुडाळ परगणा व पंचमहाल इनाम म्हणून दिले. एकूणच खेम सावंत यांनी देशमुखी आणि सत्ता आपल्याकडे राखण्यास यश मिळवले. 1709 मध्ये खेम सावंत यांचे निधन झाले. 
 
34 वर्षांची सत्ता 
खेम सावंत हे एकपत्नीव्रत पाळणारे होते. त्यामुळे त्यांची सावंतवाडीत असलेली माठी वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. त्यात स्त्रियांना प्रवेश नाही. खेम सावंत यांना पुत्र संतती नव्हती. तीन मुली होत्या. यातील द्वारका ही रामराव पाटणकर, भवानी ही घाटगे आणि तिसरी भागू ही जगदेवराव निंबाळकर यांच्या घराण्यात दिली. खेम सावंत यांनी 1697 ते 1709 अशी 34 वर्षे स्वतंत्रपणे राज्याचे काम केले.