राष्ट्रवाद ही उन्माद निर्माण करणारी संकल्पना - इंगळे

कणकवली - सत्यशोधक व्याख्यानमालेत बोलताना प्रा. देवेंद्र इंगळे.
कणकवली - सत्यशोधक व्याख्यानमालेत बोलताना प्रा. देवेंद्र इंगळे.

कणकवली - ‘राष्ट्रवाद ही माणसांच्या मनात पराकोटीचा उन्माद निर्माण करणारी संकल्पना आहे. राष्ट्रवादातून भूभागांची वाटणी होते. प्रांतानुसार माणसे विभागली जातात. प्रांता-प्रांतामध्ये हिंसक लढे लढवले जातात. यामुळे राष्ट्रवादापेक्षा आज मानवतावादाची खरी गरज आहे,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. देवेंद्र इंगळे यांनी येथे केले.

येथील मातोश्री मंगल कार्यालयात सुरू असलेल्या सत्यशोधक व्याख्यानमालेतील ‘राष्ट्रवाद त्यांचा नि आमचा’ या विषयावर प्रा. इंगळे बोलत होते. या वेळी समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कांबळे, सचिव शरद मणचेकर आदी उपस्थित होते.

प्रा. इंगळे म्हणाले, ‘‘राष्ट्र आणि त्यांच्या सीमा या सतत बदलत राहिल्या आहेत. काही वर्षांपूर्वी पाकिस्तान हा भारत या राष्ट्राचा भाग होता, आज नाही. क्रिमिया हा एक देश होता, तो आता रशिया या राष्ट्राचा भाग झालेला आहे. इस्राइल या राष्ट्राची संपूर्ण निर्मिती ही तर अगदी अलीकडच्या काळाचीच आहे. 

तर पॅलेस्टाइन हे आज अस्तित्वात असलेले राष्ट्र उद्या असेल किंवा नसेल. रशिया या एका मोठ्या राष्ट्राचे अनेक तुकडे होऊन डझनभर स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली ही देखील अलीकडच्या काळातीलच घटना आहे. यामुळे राष्ट्रवाद ही पूर्णतः मानवनिर्मित संकल्पना आहे. मात्र हा राष्ट्रवाद अवघ्या मानवजातीच्याच मुळावरच उठला असेल तर तो नष्ट करणे हे एक मानव म्हणून आपले आद्य कर्तव्यच आहे.

राष्ट्रवाद ही संकल्पना युरोपातून वसाहतकार इंग्रज, डच, पोर्तुगीज यांच्या माध्यमातून आपल्याकडे आली. तेथील पोप, राजेशाही यांच्या जाचाला विरोध करण्यासाठी राष्ट्रवाद निर्माण झाला. याउलट भारतात बुद्धकाळात, अकबर काळात, शिवाजी महाराजांच्या काळात राष्ट्रवाद नव्हता आणि या सर्वांनी देखील राष्ट्रवाद ही संकल्पनाच कधीच मांडली नाही. भारतात इंग्रजांनी आणलेल्या साहित्यातून राष्ट्रवाद ही संकल्पना पुढे आली.

त्यानंतर बकिंगचंद्र चॅटर्जी, नथुराम गोडसे, विनायक सावरकर, हेडगेवार ते गोवळकर यांनी आपापल्या पद्धतीने राष्ट्रवादाची संकल्पना मांडली.

महात्मा फुलेंनी सर्वप्रथम राष्ट्रवादाची विधायक भूमिका मांडली. सर्व धर्म, पंथ, संस्कृती या सर्वांचे सहअस्तित्व मानून, आपण सर्वजण एकमय आहोत याची जाणीव म्हणजेच राष्ट्रवाद असायला हवा. भारतात हजारो वर्षांपासून विभिन्न संस्कृती, धर्म, पंथ, भाषा आहेत. या सर्वांना एकत्रितपणे पुढे घेऊन जाण्याची संकल्पना राष्ट्रवादात हवी. पण सध्या कुठेच अस्तित्वात नसलेला ‘हिंदू राष्ट्रवाद’ही पुढे येत आहे. यात प्रामुख्याने धर्मश्रेष्ठत्व, वंश वा वर्णश्रेष्ठत्व, संस्कृती श्रेष्ठत्वाला प्राधान्य दिले जातेय. यातून आपल्याहून परक्‍या जाती-धर्माविरोधात लढा देण्यास प्रवृत्त केले जातेय.’’ 

‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ ही फसवेगिरी
‘जो हिंदू हित की बात करेगा.. वही देशपर राज करेगा’ ही घोषणा खरे तर चांगली आहे. ती प्रत्यक्ष अमलात यायला हवी. आज देशात हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ते बहुसंख्येने हिंदूच आहेत. देशातील हजारो बांधव अन्न नसल्याने अर्धपोटी आहेत तेही बहुसंख्येने हिंदूच आहेत. चांगले शिक्षण नाही, तर शिक्षण असूनही नोकरी, उद्योगधंदा नाही. शेतमालाला चांगला दर मिळत नाही. सावकारांकडून पिळवणूक होतेय. या सर्वांत प्रामुख्याने हिंदूच भरडला जातोय. या सर्व हिंदूंच्या हितासाठी ‘हिंदू हिताची’ घोषणा देणारे कधीच पुढे येत नाहीत. त्यामुळे ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ ही शुद्ध फसवेगिरी आहे, असेही श्री. इंगळे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com