नारायण राणे कोकणचे "दबंग' नेते : फडणवीस

devenrda fadnvis statement padve konkan sindhudurg
devenrda fadnvis statement padve konkan sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी नारायण राणे यांना अनेक संकटे झेलावी लागली. तरीही यशस्वीपणे त्यांनी हे महाविद्यालय उभे केले. ते कोकणचे "दबंग' नेते आहेत, असा उल्लेख राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पडवे येथील राणेंच्या मेडिकल कॉलेजच्या उद्‌घाटन प्रसंगी बोलताना केला. 

माजी मुख्यमंत्री खासदार राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उद्‌घाटन झाल्यानंतर हॉस्पिटलच्या सभागृहात भाषणे झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा यावेळी धन्वंतरी व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देवून सन्मान करण्यात आला. यावेळी राणे व फडणवीस यांच्या हस्ते शहा यांचे स्वागत करण्यात आले. 

फडणवीस म्हणाले, ""कोरोनाच्या काळात सिंधुदुर्गात राणे यांच्या माध्यमातून चांगले काम झाले. त्यांनी आपल्या लाईफ टाईम हॉस्पिटलच्या माध्यमातून याठिकाणी अत्याधुनिक कोरोना टेस्टिंग मशीन उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्याचा फायदा सिंधुदुर्गवासीयांना नक्कीच झाला. कोरो काळात सर्वाधिक वाईट काम कुठे झाले असेल तर ते महाराष्ट्रात आहे. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. त्यामुळेच राज्यात कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा सर्वाधिक राहिला आहे.'' 

खासदार राणे यांच्या "आयत्या बिळावर नागोबा', या टिकेचा धागा पकडत फडणवीस म्हणाले, की राणे साहेब काय करणार सवयच तशी आहे. आम्ही समृद्धी मार्ग सुरू केला. त्यावेळी आताचे मुख्यमंत्री विरोध करण्यासाठी तेथे गेले होते; मात्र आता तेच काम कसे चालले आहे? हे पाहण्यासाठी दोन वेळा गेले. तीच स्थिती मेट्रो कार शेडची आहे.', असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. दरम्यान, डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले. 

राणे हुशार राजकीय नेते 
महाविद्यालयाचे स्वप्न जसे नारायण राणे यांनी पूर्ण केले तसे जिल्ह्यातील लोकांना रोजगार देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून प्रयत्न करावा, असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. पुढे पाटील यांनी राणे हुशार राजकीय नेते आहेत. मेडिकल कॉलेजच्या उद्‌घाटनाला त्यांनी अमित शहा यांना निमंत्रित केले. शहा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करु शकतात. ज्यूनिअर लोकांना सूचना करू शकतात. राणे यांनी मिळविलेले राजकीय यश स्वतःच्या हिमतीवर मिळविले आहे. त्यांनी नेहमीच जनहितासाठी काम केले, असे पाटील यांनी सांगितले. 

दर्जेदार डॉक्‍टर बाहेर पडतील 
जिल्ह्यात मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार व उत्तम शिक्षण दिले जाईल, असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उद्‌घाटन प्रसंगी व्यक्त केला. मी मेडिकल कॉलेज सुरू करतोय म्हणून शिवसेनेने शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करीत 900 कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले; पण 900 कोटी देणार कुठून? तिजोरित खडखडाट आहे. चिपी विमानतळाचे उद्‌घाटन केले तेव्हा विरोध केला. पहिला विरोध करायचा आणि नंतर श्रेय घ्यायचे हाच शिवसेनेचा धंदा आहे. शिवसेना प्रत्येक विकासकामाला विरोध करते; मात्र नंतर "आयत्या बिळावर नागोबा' असते, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. 

भविष्यात खासदार, आमदार भाजपचेच 
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खासदार आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आमदार भाजपचे असतील. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करू, असा विश्‍वास आमदार नितेश राणे यांनी येथे व्यक्त केला. ते येथे आयोजित करण्यात आलेल्या हॉस्पिटलचे आभार प्रदर्शनात बोलत होते. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्व मान्यवरांचे आमदार राणे यांनी आभार मानले. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com