‘कोकणचा राजा’ देवगड हापूसची जपानवारी

‘कोकणचा राजा’ देवगड हापूसची जपानवारी

देवगड/नवी मुंबई - अवीट गोडी, दिसायला सुंदर व दर्जेदार हापूस आंब्याची आता परदेशातील नागरिकांनाही भुरळ पडली आहे. यात जपानही मागे नाही. राज्य कृषी पणन मंडळाच्या प्रयत्नाने कोकणचा राजा म्हणजेच देवगडचा हापूस (ता. १४) जपानला रवाना झाला. रत्नागिरी व देवगडमधून आलेले सुमारे ५०० किलो आंबे जपानला पाठवण्यात आले. या हंगामात १५० टन हापूस जपानला निर्यात करण्याचा पणन मंडळाचा मानस आहे. २०१५ मध्ये हापूस आंब्यावर युरोपमधील देशांनी बंदी घातली होती. त्यामुळे व्हेपर हिट ट्रिटमेंट करून आब्यांना ॲपेडाच्या माध्यमातून जपानला पाठवण्यात मंडळाला यश आले आहे.

हापूसला आंतरराष्ट्रीय बाजारातही मागणी वाढावी, यासाठी ॲपेडा व कृषी पणन मंडळ विशेष प्रयत्न करत आहे. आंबा फळमाशीमुळे युरोपमधून हापूस परत आल्याने या वेळी राज्य कृषी पणन मंडळाने जपानला हापूस पाठवताना विशेष खबरदारी घेतली. कोकणच्या विविध भागांतून आलेला हापूस आणि गुजरातचा केशर आंब्यावर व्हेपर हिट ट्रिटमेंट करून सुमारे ५०० किलो आंबे जपानला पाठवले. यंदाच्या हंगामातील हे पहिलेच आंबे जपानला गेले आहेत. या वेळी व्हेपर हिट ट्रिटमेंटमधून बाहेर आलेल्या आंब्यांचे परीक्षण करण्यासाठी जपानच्या मिनीस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर फिशरी ॲण्ड फोरेस्ट विभागाचे अधिकारी मसाहिको सेकीया एपीएमसी मार्केटमध्ये आले होते. त्यांनी ॲपेडाच्या व्हीएचपी प्लांटमध्ये स्वतः परीक्षण करून जपानला आंबे पाठवण्यास हिरवा कंदील दाखवला. आगामी काळात न्यूझीलंड, युरोप, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया व इराणसह आखाती देशांत मोठ्या प्रमाणात हापूस पाठवण्यात येणार आहे. यातील अमेरिकेत सुमारे दीड हजार टन, तर ऑस्ट्रेलियात २०० टन हापूस पाठवण्यात येणार आहे. संपूर्ण हंगामात ५० ते ७० हजार मेट्रिक टन आंबा निर्यात केला जाईल, अशी माहिती पणन मंडळाचे डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी दिली.

व्हेपर हिट ट्रिटमेंट म्हणजे काय?
आंबा निर्यात करण्यापूर्वी त्यातील फळमाशी समूळ नष्ट होण्यासाठी आंब्याला ४७.५ डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या गरम पाण्यात सुमारे २० मिनिटे ठेवले जाते. यामुळे आंब्यातील कीड मरते. आंब्याचे २० दिवसांनी आयुर्मान वाढते, असे पणन मंडळाचे म्हणणे आहे. यासाठी आंब्याची प्रतवारी केल्यानंतर आंबा निर्यात करण्यासाठी २०० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचा आंबा व्हेपर हिट ट्रिटमेंटसाठी निवडला जातो.

हापूस आंब्याला परदेशात मोठी मागणी आहे. आंबा निर्यातीमधून देशाला मोठे परकीय चलन मिळते. यासाठी राज्य सरकारने आंबा उत्पादनाला जास्तीत जास्त प्राधान्य देणे गरजेचे आहे.
- डॉ. सी. बी. सिंग, सहायक व्यवस्थापक, ॲपेडा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com