देवगड : हापूसचा ‘कॅनिंग’ हंगाम सुरू

दर तेजीत; देवगडात तूर्त ४० टन आंबा प्रक्रियेकडे
hapus mango
hapus mango sakal

देवगड : अनेक अडचणींवर मात करीत खडतर प्रवास करणाऱ्या हापूस हंगामातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या आंबा कॅनिंग व्यवसायाला आता सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्यातील आंबा कॅनिंगला येऊ लागला आहे. अद्याप फळबाजारातील आंबा पेटीचा दर टिकून असल्याने सुमारे ३० ते ३३ रुपये प्रतिकिलो कॅनिंगचा दर सध्या सुरू आहे. तालुक्यातून सुमारे ४० टन आंबा प्रक्रिया उद्योगाकडे वळत आहे. दरम्यान, अखेरच्या टप्प्यात कॅनिंग व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात आंबा येण्याची शक्यता व्यावसायिक व्यक्त करतात.

प्रक्रिया उद्योगासाठी हापूस हंगामात कॅनिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील सुमारे दोन वर्षे हंगामात अनंत अडचणी आल्या; मात्र यंदाच्या हंगामात कोरोनाचे सावट नसल्याने बंधनमुक्त व्यवसाय करण्यास वाव आहे. सध्या आंबा हंगाम जोरास येत असल्याने कॅनिंग व्यवसायाचीही मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. नुकताच व्यवसाय सुरू झाला असून कॅनिंग फॅक्टरीला आंबा जावू लागला आहे.

कॅनिंगसाठी प्रसंगी बागायतदारांच्या बागेत फिरून आंबा गोळा केला जातो. काहीवेळा बागायतदार स्वतः व्यावसायिकांकडे आपला आंबा घेऊन येतात. प्रतवारी करून उरलेला तसेच डागी आंबा कॅनिंगला दिला जातो. कॅनिंगमुळे स्थानिक पातळीवर संलग्न व्यवसायातून रोजगार निर्मिती होण्यासही मदत होते. यंदा सुरूवातीपासून आंबा हंगामाचा खडतर प्रवास सुरू होता. रोजचे बदलते वातावरण, ढगाळ हवामान, किडरोगाचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस, वादळी परिस्थिती यामुळे आंबा पीक अडचणीत सापडल्याने सुरुवातीच्या आंबा उत्पादनावर त्याचा परिणाम जाणवला.

त्यामुळे सुरूवातीचे जादा उत्पन्न मिळवून देणारे आंबा उत्पादन शेतकऱ्यांच्या हातून काही प्रमाणात निसटले. दुसऱ्या टप्यातील हंगामाला सुरूवात झाली असून कॅनिंग व्यवसायही आता सुरू झाले आहेत. अखेरच्या टप्यातील आंबा मोठ्या प्रमाणात कॅनिंग व्यवसायाकडे वळेल असे व्यावसायिकांचे निरीक्षण आहे. अजून मुबलक प्रमाणात आंबा कॅनिंगसाठी मिळत नसला तरी मेच्या सुरूवातीपासून आंबा कॅनिंगकडे अधिक येईल असे चित्र आहे.

साधारणतः २५ मेपर्यंत कॅनिंग व्यवसायाला मोठ्या प्रमाणात आंबा मिळेल, असे सांगितले जाते. सध्या दिवसाकाठी सुमारे ४० टन आंबा प्रक्रीया उद्योगाकडे वळत आहे. रोजचे कॅनिंगसाठी येणाऱ्या आंब्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या व्यवसायाशी संलग्न असलेल्या व्यवसायाला तसेच रोजगाराच्या संधीलाही आता बळकटी आल्याचे चित्र आहे.

यंदाचा कॅनिंग हंगाम नुकताच सुरू झाला आहे. यंदा सुरूवातीचा मोहोर वाया गेल्याने तुलनेत पहिल्या टप्यातील आंबा उत्पादन कमी झाले. तरीही आंबा हंगाम सावरत आता ‘कॅनिंग’ सुरू झाले आहे. सध्या कॅनिंगचा दर ३० ते ३३ रूपये प्रतिकिलो आहे. तालुक्यातून सुमारे चाळीस टन कॅनिंग आंब्याची उलाढाल आहे. टप्याटप्याने यामध्ये वाढ होईल.

- मंगेश वेतकर, कॅनिंग व्यावसायिक, पडेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com