‘देवगड हापूस’चा हंगाम लवकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

देवगड - आंबा हंगाम यंदा लवकर सुरू होण्याची शक्‍यता आहे. थंडी पडण्यास सुरवात झाल्याने देवगड हापूसच्या क्षेत्रात आंबा कलमे मोहरू लागली आहेत. यातून यंदाच्या ‘देवगड हापूस’ हंगामाची चाहूल लागली आहे. कलमांना मोहर येऊ लागल्याने फवारणीच्या कामाला जोर आला आहे.

देवगड - आंबा हंगाम यंदा लवकर सुरू होण्याची शक्‍यता आहे. थंडी पडण्यास सुरवात झाल्याने देवगड हापूसच्या क्षेत्रात आंबा कलमे मोहरू लागली आहेत. यातून यंदाच्या ‘देवगड हापूस’ हंगामाची चाहूल लागली आहे. कलमांना मोहर येऊ लागल्याने फवारणीच्या कामाला जोर आला आहे.

यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले. आता किनारपट्टीवर आंबा हंगामाला पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. वाराही सुटत आहे. बदलते वातावरण आंबा बागायतदारांच्या दृष्टीने सुखावह ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. झाडांमधून निर्धोक मोहोर बाहेर पडण्यासाठी बागायतदारांनी फवारणी सुरू केली आहे. काही प्रगतिशील आंबा बागायतदारांचे फवारणीचे नियोजन यापूर्वीच सुरू झाले आहे. तालुक्‍याच्या काही भागांत आंबा कलमे मोहोरण्यास सुरवात झाली. प्रयोगशील बागायतदारांच्या बागेत मोहोर दिसू लागला.

काही ठिकाणी तुरळक प्रमाणात मोहोरावर कणीही दिसत आहे. तालुक्‍याच्या काही भागांतून यंदा पावसाळ्यात आलेल्या मोहोराचे जतन करून तयार झालेला आंबा फळ बाजारात गेला. आता पहिल्या टप्प्यातील आलेला मोहोर टिकवून त्यातून उत्तम फलधारणा होण्यासाठी बागायतदार काळजी घेत आहेत. हंगामातील सुरवातीच्या आंबा फळांना बाजारात तुलनेत अधिक दर मिळत असल्यामुळे वाढीव दराचा लाभ मिळवण्यासाठी बागायतदारांची धडपड असते. त्यासाठी बागायतदारांची फवारणी सुरू झाली आहे. कलमे मोहोरण्याची सुरवात झाल्याने यंदाच्या ‘देवगड हापूस’ हंगामाची चाहूल लागली आहे.

झाडावरील जुन झालेल्या पालवीतून मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस वगळता सध्याचे वातावरण हंगामाला पोषक आहे. आंबा कलमे मोहरू लागल्याने यंदाच्या हंगामाची चाहूल लागली आहे. फवारणीला सुरवात झाली; मात्र आलेल्या मोहोरातून कितपत फलधारणा होईल हे कळेल.
- श्रीकांत नाईकधुरे, 

आंबा बागायतदार, बापर्डे

Web Title: Devgad Hapus season soon