विजयदुर्ग किल्ला विज्ञानप्रेमींसाठीही आकर्षण

संतोष कुळकर्णी
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

हेलियम वायूचा इथेच लागला शोध : पर्यटकांबरोबरच अभ्यासकांनाही किल्ला घालतोय साद

हेलियम वायूचा इथेच लागला शोध : पर्यटकांबरोबरच अभ्यासकांनाही किल्ला घालतोय साद
देवगड  सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्‍यातील किल्ले विजयदुर्गवर 18 ऑगस्ट 1868 रोजी वातावरणातील हेलियम वायूचा शोध लागला. आज या घटनेला 149 वर्षे होत आहेत. हेलियमचे पाळणाघर अशी ओळख असलेला आणि पराक्रमाची गाथा सांगणारा किल्ले विजयदुर्ग पर्यटकांबरोबरच आता अभ्यासकांनाही साद घालीत आहे. अलीकडे काही वर्षे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून "विश्‍व हेलियम दिन' साजरा होतो, त्यामुळे या ऐतिहासिक किल्ल्यावर विज्ञानप्रेमींची गजबजही वाढत आहे. अनेक खगोल अभ्यासकही किल्ल्यावर येतात.
सिंधुदुर्गातील सर्वात प्राचीन जलदुर्ग म्हणून किल्ले विजयदुर्गकडे पाहिले जाते. 1195 ते 1205 या कालावधीमध्ये शीलाहार घराण्यातील राजा भोज याने किल्ल्याची निर्मिती केली. शिवाजी महाराज यांच्या आरमारामध्ये या किल्ल्याला मोठे महत्त्व होते. मराठ्यांच्या आरमारात या किल्ल्याला सर्वोच्च स्थान होते. ऐतिहासिक ठेवा असलेल्या किल्ले विजयदुर्गने आठशेहून अधिक वर्षांत अनेक स्थित्यंतरे अनुभवली. त्यातीलच एक म्हणजे हेलियम वायूचा शोध. त्यामुळे केवळ ऐतिहासिक घटनांचाच नव्हे; तर वैज्ञानिक संदर्भानेही किल्ले विजयदुर्गची ओळख तयार झाली.

किल्ल्याचा अष्टशताब्दी महोत्सव सोहळाही अत्यंत दिमाखात झाला होता, त्यामुळे किल्ला पर्यटनाच्या नकाशावर येण्यास मदत होऊन पर्यटकांची वर्दळ वाढली. किल्ल्यावरील "सायबांचे ओटे' ही जागा पाहून हेलियम वायूच्या शोधाची पर्यटकांना माहिती मिळू लागली. पर्यटकांना राहण्यासाठी निवास, न्याहरीसह इतर सुविधा देणारी रिसॉर्ट आहेत. 18 ऑगस्ट 1868 या दिवशी किल्ले विजयदुर्गने विलक्षण घटना अनुभवली. ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर जे. नॉर्मन लॉकियार यांनी याच दिवशी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी किल्ले विजयदुर्ग ही जागा निश्‍चित केली. अक्षांश, रेखांशाच्या दृष्टीने ग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी ही जागा त्यांना संयुक्‍तिक वाटली. दुर्बीण ठेवण्यासाठी त्यांनी तेथे लहान दगडी चबुतरा बांधला होता. त्याला पुढे "सायबांचे ओटे' असे संबोधले जाऊ लागले. ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ले विजयदुर्ग खगोलशास्त्रज्ञांसाठीसुद्धा हेलियमचे शोधस्थान म्हणून महत्त्वाचा ठरला आहे.
सर जे. नॉर्मन लॉकियार यांनी दुर्बिणीवर स्पेक्‍ट्रोमीटर चढवून 18 ऑगस्ट 1868ला सूर्यग्रहणाचा अभ्यास केला. ग्रहणकाळ सकाळी 8 वाजून 21 मिनिटांनी सुरू झाला. त्यांनी दुर्बीण सूर्यावर रोखून ठेवली होती. 9.24 ते 9.32 या काळात खग्रास सूर्यग्रहण होते. या काळात त्यांना स्पेक्‍ट्रोग्राफवर 587.49 नॅनोमीटर लहर लांबी (व्हेवलेंग्थ) असलेली एक पीत वर्णरेषा दिसली आणि हा क्षण अभूतपूर्व ठरला. या वर्णरेषेचा स्रोत हा सूर्याच्या तप्त वातावरणातील एका नवीन मूलद्रव्यात असला पाहिजे, असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्याला त्यांनी हेलियम (ग्रीक भाषेत Helios म्हणजे सूर्य) नाव दिले. पुढे सुमारे 25 वर्षांनी विल्यम रामसे यांनी या पायावर कळस चढवला आणि हेलियमच्या शोधावर शिक्‍कामोर्तब केले. अलीकडे हाच दिवस "हेलियम डे' म्हणून साजरा करण्यामुळे याविषयी जागृती वाढली. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून विविध मान्यवरांसह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करून "हेलियम डे' साजरा होतो. यामुळे या ऐतिहासिक किल्ल्यावर विज्ञानप्रेमींची गजबज वाढते.

हेलियमची वैशिष्ट्ये
* हायड्रोजननंतर मुबलक उपलब्ध असणारा वायू
* एकमेव द्रव्य जे पृथ्वीवर शोधण्यापूर्वी सूर्यावर शोधले गेले
* मूल्यवान वायू - ज्याचा उपयोग आर्क - वेल्डिंग, लेझर आणि आण्विक भट्ट्यांतील शीतकारक वायू म्हणून होतो
* समुद्रातील संशोधक पाण्याखाली असताना ऑक्‍सिजन आणि हेलियम यांच्याच मिश्रणाचा श्‍वसनासाठी वापर करतात
* हा अतिहलका, कायम वायुरूप आणि कधीही घनरूप न घेणारा एकमेवाद्वितीय वायू आहे
* एमआरआय यंत्रामध्ये चुंबकासाठी शीतकारक म्हणून हेलियमचा वापर होतो. बलून्समध्येही हेलियमचा वापर करून अवकाशात सोडतात

माणसांचे वाढदिवस सारेच करतात. मात्र, 18 ऑगस्ट 1868 रोजी लागलेल्या एका शोधाचा वाढदिवस म्हणून 2008 पासून आम्ही किल्ले विजयदुर्गवर "हेलियम डे' साजरा करीत आहोत. भविष्यात विद्यार्थी आणि पर्यटकांच्या अभ्यासासाठी नेहरू तारांगणच्या धर्तीवर मिनी तारांगण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यातून खगोल अभ्यासाची गोडी वाढण्यासाठी मदत होईल.
- प्रमोद जठार, माजी आमदार, भाजप

Web Title: devgad konkan news Vijaydurg fort also attracts scientists