थंडीने काजू मोहोरला; आंब्याला मात्र प्रतीक्षाच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

देवरूख - जानेवारी महिना मध्यावर आला असून मध्यंतरी पडलेल्या कडाक्‍याच्या थंडीने परिसरातील काजू कलमे मोहोराने लगडली आहेत. काजू मोहरले तरी आंब्याला मोहोराची प्रतीक्षा असून खाडी भागात मात्र आंबा आणि काजूचा मोहोर समाधानकारक आहे.

देवरूख - जानेवारी महिना मध्यावर आला असून मध्यंतरी पडलेल्या कडाक्‍याच्या थंडीने परिसरातील काजू कलमे मोहोराने लगडली आहेत. काजू मोहरले तरी आंब्याला मोहोराची प्रतीक्षा असून खाडी भागात मात्र आंबा आणि काजूचा मोहोर समाधानकारक आहे.

गेल्यावर्षी अवकाळी पावसाने सर्वांचाच हिरमोड केला. दरवर्षी सप्टेंबर-आॅक्‍टोबरपर्यंत मर्यादित असलेला पाऊस गेल्यावर्षीही लांबला. त्यामुळे थंडीचा मोसम लांबला आणि बदललेल्या वातावरणामुळे मोहोर येण्याच्या प्रक्रियेस उशीर झाला. तालुक्‍यातील खाडीभाग वगळता अन्य भागांत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मोहोराला सुरुवात झाली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कडाक्‍याची थंडी होती. मात्र मध्येच आलेल्या ढगाळ वातावरणाने मोहोराचा घात होण्याची शक्‍यता होती. मात्र पुन्हा ढगाळ वातावरण गायब झाले आणि थंडीचा कडाका वाढल्याने तालुक्‍यातील बहुतांश भागांतील काजू कलमे भरगच्च मोहरताना दिसत आहेत. 

तालुक्‍यातील इतर भागात काजूच्या तुलनेत आंब्याला मोहोर कमी असल्याचे दिसत आहे.

खाडीभागातील खाऱ्या हवामानामुळे या परिसरात आंबा कलमे भरगच्च मोहरली असून मोहोराचे रुपांतर छोट्या कैऱ्यांमध्ये होत आहे. दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात कैऱ्या विक्रीसाठी येतात यावर्षी यासाठी फेब्रुवारी महिना उजाडणार आहे. लांबलेल्या प्रक्रियेमुळे आंबा पिकण्यालाही उशीर होणार असून यावर्षीचा तालुक्‍यातील आंब्याचा हंगाम एप्रिल-मे महिन्यात जाण्याची शक्‍यता आहे. हवामानाने साथ दिली तर आंबा लवकर पिकेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना लहरी वातावरणाचा फटका यावर्षीही बसला असून भातशेतीच्या नुकसानानंतर निदान आलेला आंबा तरी हातात पडू दे अशी प्रार्थना बागायतदार निसर्गाकडे करीत आहेत.

Web Title: devrukh konkan news cashew cold mango