देवरूख-मार्लेश्‍वरपर्यंत प्रवास आरामदायी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

रस्त्यासाठी १६१ कोटी मंजूर - पावसाळ्यानंतर रस्ता दुपदरीसह चकाचक

देवरूख - पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या बावनदी-पांगरीमार्गे देवरूख-मार्लेश्‍वर या रस्त्यासाठी १६१ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे पावसाळ्यानंतर हा रस्ता चकाचक होणार असून महामार्गावरून देवरूख आणि मार्लेश्‍वरला कमी वेळेत पोचणे शक्‍य होणार आहे.

रस्त्यासाठी १६१ कोटी मंजूर - पावसाळ्यानंतर रस्ता दुपदरीसह चकाचक

देवरूख - पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या बावनदी-पांगरीमार्गे देवरूख-मार्लेश्‍वर या रस्त्यासाठी १६१ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे पावसाळ्यानंतर हा रस्ता चकाचक होणार असून महामार्गावरून देवरूख आणि मार्लेश्‍वरला कमी वेळेत पोचणे शक्‍य होणार आहे.

राज्यातील लाखो शिवभक्‍तांचे श्रद्धास्थान असलेल्या मार्लेश्‍वरला वर्षभर पर्यटकांसह भाविकांची मोठी मांदियाळी असते. या देवस्थानाकडे जाणारा देवरूखपासूनचा मार्ग एकेरी असून ‘क’ वर्ग पर्यटनस्थळांच्या विकासनिधीतून रस्त्यासाठी पैसेच मिळत नसल्याने तो वाहतुकीसाठी गैरसोयीचा बनला आहे. याबाबत ग्रामस्थांसह विश्‍वस्त समितीनेही शासनाकडे रस्ता दुपदरी आणि कायमस्वरूपी मजबूत करण्याची मागणी केली होती. याकडे दुर्लक्षच केले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण यांनी या गोष्टीत लक्ष घालून तसेच स्थानिक जिल्हा परिषद सदस्य सौ. मुग्धा जनक जागुष्टे यांनीही पाठपुरावा केल्याने या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. 

हा रस्ता केवळ देवरूख-मार्लेश्‍वर न करता मुंबई-गोवा महामार्गापासूनच तो चकाचक करावा यासाठी बावनदी-पांगरीमार्गे देवरूख-मार्लेश्‍वर अशा ५७ किमी मार्गाचे दुपदरीकरण आणि डांबरीकरण यासाठी शासनाच्या हायब्रीड ॲन्युटी उपक्रमातंर्गत या रस्त्याला १६१ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये रुंदीकरण, खडीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण, लहान पूल व मोऱ्यांची उभारणी करणे या कामांचा समावेश करण्यात आला आहे. एम.आर.आय.पी योजनेतंर्गत मिळणाऱ्या निधीपैकी एकूण रकमेच्या ४० टक्‍के रक्‍कम ही बांधकाम कालावधीत देण्यात येणार आहे. उर्वरित ६० टक्‍के रक्‍कम ठेकेदाराला स्वतः उभी करावी लागणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ६० टक्‍के रक्‍कम शासन अादा करणार आहे. 

गेल्या अनेक वर्षांची मागणी असलेला देवरूख-पांगरी-बावनदी आणि देवरूख-मार्लेश्‍वर असा ५७ किमीचा मार्ग एकाच वेळेत एकाच योजनेतून पूर्ण होणार असल्याने आता पर्यटकांना सुसाट प्रवासाचा आनंद मिळणार आहे. 

देवरूख-मार्लेश्‍वर रस्त्यासाठी स्थानिक ग्रामस्थ गेले अनेक वर्षे पाठपुरावा करीत होते; मात्र पालकमंत्री, खासदार, आमदारांनी यात विशेष लक्ष घालून हा निधी आमच्यासाठी उपलब्ध करून दिला. या रस्त्याबरोबरीनेच देवरूख-बावनदी मार्गाचाही प्रश्‍न निकाली निघाला आहे. यामुळे पर्यटकांची मोठी सोय होणार आहे.’’
- सौ. मुग्धा जनक जागुष्टे, जिल्हा परिषद सदस्य

Web Title: devrukh konkan news devrukh-marleshwar journey