पाणीप्रश्‍नी सेना करणार सत्ताधाऱ्यांची कोंडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

देवरूख - शहरातील पाणीटंचाईबाबत सत्ताधाऱ्यांवर शिवसेनेने आगपाखड केली. आता त्यापुढे जाऊन निषेधाचे अस्त्र उपसले आहे. ३१ मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांचा निषेध करणार आहेत, शिवाय सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणार असल्याची माहिती नगरसेवक बंड्या बोरुकर यांनी दिली.

देवरूख - शहरातील पाणीटंचाईबाबत सत्ताधाऱ्यांवर शिवसेनेने आगपाखड केली. आता त्यापुढे जाऊन निषेधाचे अस्त्र उपसले आहे. ३१ मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांचा निषेध करणार आहेत, शिवाय सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणार असल्याची माहिती नगरसेवक बंड्या बोरुकर यांनी दिली.

सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेला पाण्याने हात दिला आहे. त्यामुळे देवरूखचा पाणीप्रश्‍न अधिकच पेटण्याची शक्‍यता आहे. गेले पंधरा दिवस एक दिवसआड पाणीपुरवठा होणाऱ्या देवरुखात आता पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही धरणांत खडखडाट झाल्याने नगरपंचायतीने पाणी बंदचा निर्णय घेऊन टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला. 

सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेने लगेचच पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर तोफ डागली. पावसाळा संपल्यानंतर लोखंडी प्लेटस्‌ बदलण्याऐवजी त्या डिसेंबरनंतर बदलण्यात आल्या तसेच प्लेटस्‌ला रबर बसविण्याच्या नावाखाली लाखो लिटर पाणी वाहून गेल्यानेच शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा दावा केला. टंचाईला निसर्ग नाही, तर सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोपही केला. गेल्या दीड वर्षात शिवसेनेने प्रथमच सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवला आहे. मासिक सभेत सत्ताधाऱ्यांना पाणी समस्या त्रासदायक ठरणार हे स्पष्ट आहे. सभागृहात शिवसेनेचे ७, तर सत्ताधारी आघाडीकडे १० नगरसेवक आहेत. त्यामुळे संख्याबळाची चिंता सत्ताधाऱ्यांना नाही.

पाऊस कोणाला साथ देणार?
सध्या देवरूखवासीयांना नियमित पाणीपुरवठा होतो; मात्र तो फार कमी आहे. दोन चार हंडे पाणी मिळते. यामुळे नगरपंचायतीसमोरची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. पाऊस सुरू होण्यास किमान आठवड्याभराचा कालावधी आहे. दरम्यान पाऊस पडून गेला तर सत्ताधाऱ्यांचे सुदैव, विलंब झाला तर शिवसेना पाणी प्रश्‍नाचे भांडवल करणार हे स्पष्ट आहे.

Web Title: devrukh konkan news shivsena planning for water issue