अनाथांच्या नाथा तुज नमो ; देवरुखात 'या दहा मुली' साजरा करणार दिड दिवसांचा गणेशोत्सव

प्रमोद हर्डीकर | Friday, 21 August 2020

देवरुख मातृमंदिर गोकुळ बालीकाश्रमातील मुलींनी तयार केली मातीची गणेशमूर्ती

साडवली (रत्नागिरी) : ज्यांना कोणी वाली नसतो त्यांना देवाचाच आधार असतो.अनाथांच्या नाथा तुज नमो असे म्हणत देवरुख मातृमंदिर गोकुळ बालीकाश्रमातील दहा मुली दिड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करणार आहेत.यासाठी या मुलींनी चक्क मातीची गणेशमूर्ती तयार केली आहे व तीचेच पुजन चतुर्थीला होणार आहे.

गेली अनेक वर्ष गोकुळ बालीकाश्रमात गणेशोत्सवात  दिड दिवस गणेशाची आराधना केली जात आहे.या मुलींना गोकुळ हाच एक आधार असल्याने या मुली एकजुटीने आपला आनंद शोधत असतात व त्यातच रममाण होत भविष्याची स्वप्ने रंगवली जात असतात.दिड दिवसाच्या गणेशोत्सवासाठी या मुलींनी आठ दिवसात माती आणुन ती मळुन प्रत्येकीने आपला हातभार लावून गणरायाची सुबक मूर्ती तयार केली.रंगकामही करुन चतुर्थीला ही गणेशमूर्ती विराजमान होणार आहे.गोकुळ बालीश्रम ते बेर्डे सभागृह अशी ही गणेशमूर्ती आणली जाणार आहे.कोरोना काळात सर्व नियम पाळुन हा उत्सव या मुली साधेपणाने पार पाडणार आहेत.

हेही वाचा- गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत चैतन्य़़; पण सोशल डिस्टन्सचे तीन तेरा... कुठल्या जिल्ह्यात घडतयं! -

साधेपणाची आरास करुन रांगोळ्या रेखाटुन आरती,गणेशाची गाणी म्हणत या मुली बुद्घीची देवता श्री गणरायाची आराधना करणार आहेत.दिड दिवस या मुली गणरायाच्या सेवेत रममाण होणार आहेत.या मुलींना अभिजित हेगशेट्ये,आत्माराम मेस्ञी,अंकीता चौगुले यांचे मार्गदर्शन मिळत आहे.या दिड दिवसाच्या गणेशोत्सवाचे परिसरातुन विशेष कौतुक होत आहे.

संपादन - अर्चना बनगे