शिवसेनेची ‘पाणी’दार चाल; ‘निवडणूक २०१८’चे लक्ष्य

संदेश सप्रे
मंगळवार, 30 मे 2017

देवरूख नगरपंचायत - धरण आटले, तरी राजकारणाचे पाट वाहतेच; निसर्गाचीही साथ
देवरूख - शहरातील पाणीटंचाईचा मुद्दा उचलून धरत शिवसेनेने समांतर पाणीपुरवठा सुरू केला. याद्वारे नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांवर नजर ठेवून सेनेने पावले उचलण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातले पाणी आटले असले तरी देवरूखमध्ये राजकारणाचे पाट वाहू लागल्याचे चित्र आहे. शहरातील पाणीबाणीची ही स्थिती कोणाच्या फायद्याची ठरणार याचे उत्तर वर्षभरातच मिळणार आहे.

ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यावर पहिलीच सार्वत्रिक निवडणूक शिवसेना-भाजपने युती करून लढवली. यात सेनेचे ७, तर भाजपचे ५ असे १७ पैकी १२ नगरसेवक निवडून आल्याने युतीची सत्ता आली. त्यानंतर पहिली अडीच वर्षे सारे आलबेल होते. नगराध्यक्ष - उपनगराध्यक्षपदाची अदलाबदल झाली; मात्र राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर युतीत माशी शिंकली आणि देवरुखातून युतीच्या काडीमोडाची सुरुवात झाली. पालिकेत सर्वाधिक मोठा पक्ष असूनही सेनेच्या हातावर तुरी देत भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्या वापरत नगराध्यक्षपद ताब्यात घेतले.

त्यावेळी झालेली नगराध्यक्षपदाची निवडणूक अपहरण नाट्यावरून गाजली होती. त्यानंतर गेले दीड वर्ष सत्ताधारी काही चूक करतात का याकडे शिवसेनेचे लक्ष होते; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शिवसेनेच्या सुदैवाने निसर्गानेच तिला साथ दिली. 

शहराचा पाणीपुरवठा बंद करावा लागला आणि सेनेला मुद्दा मिळाला. 
शहराच्या पाणीप्रश्‍नावरून सेनेने भाजप आघाडीला कोंडीत पकडले आहे. टंचाईला सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप केला. सेनेचा पहिला बाण नेमका लागला. कालपासून (ता. २८) शहरात समांतर मोफत पाणीपुरवठा सुरू करून शिवसेनेने आपली दुसरी चाल खेळली. पाण्याचा मुद्दा भावनिक असल्यामुळे ती यशस्वीही झाली. आता ३१ मेच्या सभेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा मनसुबा आहे.

पाण्यानंतरचा मुद्दा कोणता?
शिवसेनेच्या या हालचाली म्हणजे आगामी सार्वत्रिक निवडणुकीचीच तयारी मानली जात आहे. नगरपंचायतीची मुदत मार्च २०१८ ला संपेल. त्यावेळी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार. त्यामुळे भाजपला आव्हान देत जनमत आपल्या बाजूला वळवण्यासाठी सेनेने पाण्याचा मुद्दा उचलला. शिवसेनेकडून देवरूखवासीयांसाठी आणखी उपक्रम राबविण्याची तयारी करण्यात आली आहे. पाण्यानंतर शिवसेना कोणता मुद्दा उचलणार, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: devrukh news water supply by shivsena