‘पेण’च्या ‘मल्ल्यां’ना बेड्या ठोका

‘पेण’च्या ‘मल्ल्यां’ना बेड्या ठोका

ठेवी परत मिळण्यासाठी अलिबागमध्ये संघर्ष समितीचे आक्रमक धरणे

अलिबाग - पेण अर्बन बॅंक गैरव्यवहाराच्या तपासातील दिरंगाईच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. २) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेण अर्बन बॅंक ठेवीदार, खातेदार संघर्ष समितीच्या वतीने एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. ठेवी परत मिळाल्याच पाहिजेत, बॅंक संचालकांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करा, कोट्यवधींची बुडीत कर्जे लुटणाऱ्या ‘गावठी मल्ल्यां’ना बेड्या ठोका, अशा मागण्या आक्रमक झालेल्या ठेवीदारांनी केल्या.

आमदार संजय केळकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार धैर्यशील पाटील, कार्याध्यक्ष नरेन जाधव आणि पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. पेण अर्बन बॅंकेतील ७५८ कोटींच्या गैरव्यवहारामुळे जवळपास दोन लाख ठेवीदारांची आयुष्यभराची कमाई धोक्‍यात आली आहे. उच्च न्यायालय, सहकार विभागाने वेळोवेळी सकारात्मक व स्पष्ट आदेश देऊनही ठेवीदारांना न्याय मिळत नसल्याने संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

बॅंकेच्या विविध शाखांमधील ठेवीदार आणि खातेदार सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जमले होते. पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकीकडे जिल्हाधिकारी शितल तेली-उगले यांच्या दालनात याच संदर्भात बैठक सुरू असताना दुसरीकडे ‘कोण बोलतो देणार 
नाय-घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘आमचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले. त्या वेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच आंदोलनस्थळी बोलवा, असा आग्रह धरला. नेत्यांनी त्यांची समजूत काढली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, त्या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारसकरही उपस्थित होते.

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि शिष्टमंडळातील धैर्यशील पाटील, संजय केळकर, नरेन जाधव, प्रीतम पाटील यांच्यात बराच वेळ चर्चा सुरू होती. उगले व पारसकर यांनी शिष्टमंडळाची बाजू ऐकून घेत त्यांना सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.   भाजप आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, पेण अर्बन बॅंकेच्या ताब्यात असलेल्या कोट्यवधी किमतीच्या जमिनींची विक्री करून त्यातून ठेवीदार आणि खातेदारांना पैसे देण्याचा विचार मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस करत आहेत. 

पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप
शेकापचे आमदार व संघर्ष समितीचे नेते धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, ठेवीदार व खातेदारांचे कष्टाचे पैसे परत मिळण्यासाठी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेतून चांगले काही घडेल असे वाटते. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, तर मी त्यांच्याशी संघर्ष करेन. १२८ बोगस खातेदारांसंदर्भात सर्व पुरावे संघर्ष समितीने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना दिले आहेत. पुढील जबाबदारी पोलिसांची असतानाही पोलिस ती पार पाडत नाहीत, ही शोकांतिका आहे.

ठेवीदार आणि खातेदारांविषयी जिल्हा प्रशासनाला कळकळ नसल्यानेच या प्रश्‍नाचे घोंगडे भिजत पडले आहे. ७५८ कोटींचे कर्जवाटप झाले असताना वसुली मात्र दोन कोटींची होते. त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली पाहिजे. गरिबाने कर्ज थकविल्यास वसुलीसाठी तगादा लावला जातो; मात्र कोट्यवधींची कर्ज घेणारे आजही उजळमाथ्याने फिरत आहेत.
- प्रीतम पाटील, नगराध्यक्षा, पेण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com