सीसीटीव्हीनंतरही ‘धूमस्वार’ सुसाटच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

सावंतवाडी - पोलिसांकडून शहर सीसीटीव्हीच्या रेंजमध्ये आणल्यानंतर सुद्धा शहरातील धूमबाईक स्वारांची टोळकी आवरण्यास पोलिसांना अपयश आलेले आहे. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत महागड्या गाड्या घेऊन किंवा जुन्या गाड्या मॉडीफाय करून भरधाव वेगाने गाड्या हाकून मोठा आवाज करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. याबाबत वेळोवेळी लक्ष वेधूनही पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

सावंतवाडी - पोलिसांकडून शहर सीसीटीव्हीच्या रेंजमध्ये आणल्यानंतर सुद्धा शहरातील धूमबाईक स्वारांची टोळकी आवरण्यास पोलिसांना अपयश आलेले आहे. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत महागड्या गाड्या घेऊन किंवा जुन्या गाड्या मॉडीफाय करून भरधाव वेगाने गाड्या हाकून मोठा आवाज करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. याबाबत वेळोवेळी लक्ष वेधूनही पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

शहरात सध्या काही युवकांकडून महागड्या गाड्या घेऊन बाजारपेठ ते महाविद्यालय परिसर आणि शिवउद्यान ते राजवाडा, अशा भरधाव वेगाने हाकल्या जातात. त्या गाड्यांचा आवाज हा कर्णकर्कश असतो. जुन्या गाड्या मॉडीफाय करून यात सहभागी होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशा गाड्यांचा आवाज सुद्धा कानठळ्या बसविणारा असतो. संबंधित गाड्यांचा वेग लक्षात घेता या ठिकाणी अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. याबाबत मोती तलावावरून फेरफटका मारणाऱ्या नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित धूमबाईक चालकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 

पोलिसांकडून शहरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तब्बल ४३ ठिकाणचे रस्ते यात घेतले. त्यानंतर तरी धूमबाईकांवर आवर घालण्यास पोलिस यशस्वी होतील, अशी अपेक्षा होती; मात्र सद्यस्थिती लक्षात घेता हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कारवाईची अपेक्षा
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘आपण संबंधितांवर कारवाईची मागणी केली; मात्र एका पोलिस अधिकाऱ्याला कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाबाबत विचारले असता ते म्हणाले संबंधितांच्या गाड्यांना आरटीओ विभागाकडून संमती देण्यात आली आहे. यामुळे अशा गाड्यांवर त्यांनीच कारवाई करणे अपेक्षित आहे, असे सांगून त्यांनी आपले हात वर करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आता आरटीओ अधिकाऱ्यांनी सुद्धा अशा गाड्यांवर लक्ष ठेवायला हवे.’’

सीसीटीव्हीच्या माध्यमातून संबंधित धूमबाईकस्वारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जे भरधाव वेगाने गाड्या हाकतील त्यांच्यावर पाठलाग करून अथवा जाग्यावर जाऊन कारवाई करणे शक्‍य नाही. यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्यांचे नंबर घेऊन थेट त्यांना न्यायालयात पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर निश्‍चितच हे प्रकार कमी होतील.
- शंकर पाटील, पोलिस निरीक्षक

Web Title: Dhoom bike gang