डिजिटल आर्थिक साक्षरतेसाठी जिल्हा बॅंक सरसावली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

मंडणगड - ग्रामीण भागातील जनतेमध्ये डिजिटल आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची मंडणगड शाखा सरसावली आहे. पंधरा दिवसांच्या कालावधीत तालुक्‍यातील दहा ठिकाणी जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यात हजारहून अधिक महिला व पुरुष ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

मंडणगड - ग्रामीण भागातील जनतेमध्ये डिजिटल आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची मंडणगड शाखा सरसावली आहे. पंधरा दिवसांच्या कालावधीत तालुक्‍यातील दहा ठिकाणी जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यात हजारहून अधिक महिला व पुरुष ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

नाबार्डचे निर्देशाने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या मंडणगड शाखेतर्फे २१ डिसेंबर २०१६ ते ५ जानेवारी २०१७ दरम्यान तालुक्‍यात दहा ठिकाणी जनजागृती करण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन केले होते. २१ डिसेंबरला तुळशी व आंबवणे, २२ ला  कादवण व भोळवली, २७ ला  पालघर, २८ ला  उमरोली, वेसवी, ३० डिसेंबरला निगडी व घुमरी आणि ५ जानेवारी पालेकोंड या ठिकाणी मेळावे घेण्यात आले. बदलत्या युगात प्रत्येक व्यक्तीने आर्थिक साक्षर असणे गरजेचे असल्याने आर्थिक साक्षरता, नोटविरहित व्यवहार, बॅंकांच्या सुविधा, कॅशलेस व्यवहारांची माहिती देण्यात आली. मेळाव्यात उपस्थित असलेल्या व  बॅंक खाते नसणाऱ्या ग्रामस्थांकडून नवीन बॅंक खाती उघडण्यासाठी अर्ज भरून घेऊन संबंधित शाखांकडे देण्यात आले. तसेच एटीएम कार्डंकरिता अर्ज भरून घेण्यात आले. एटीएम कार्डचा वापर, मायक्रो एटीएम पोस्टची माहिती, मोबाइल बॅंकिंग एनयूपी, यूएसएसडी, यूपीआय या डिजिटल बॅंकिंगच्या विषयांची माहिती देण्यात आली. या विषयासंदर्भात जनजागृती करणारी शॉर्ट फिल्म प्रोजक्‍टरच्या माध्यमातून दाखवण्यात आली. 

याचबरोबर तालुका शाखेत आर्थिक साक्षरता केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या केंदाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना जीवनातील दैनंदिन आर्थिक व्यवहारात बॅंकाचे महत्त्व, डिजिटल व्यवहारांची माहिती दिली. यावेळी सहायक सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर, व्यवस्थापक संजय शिगवण, लिपिक मनोज बोर्जी, अभिषेक गायकवाड, एफएलसी समन्वयक सुधीर कुळे, अशोक भोसले यांनी मेळाव्यांमध्ये ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

Web Title: Digital literacy and financial district convention Bank