रस्ता तपासण्यासाठी डिजिटल तंत्र

- अमोल टेंबकर
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

सावंतवाडी - बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या जिल्ह्यातील तब्बल बाराशे किलोमीटर लांबी असलेल्या राज्य महामार्गाचा ‘ड्रायव्हिंग स्मुथनेस’ डिजिटल तंत्रज्ञानाने तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात प्रमुख राज्यमार्गासह जिल्हा मार्गाचा समावेश आहे. ही प्रक्रिया राबविल्यामुळे ‘बांधकाम’च्या अधिकाऱ्यापासून मंत्रालयात बसणाऱ्या सचिवापर्यंत सर्वांना बसल्याजागी रस्त्याची वस्तुस्थिती कळण्यास मदत होणार आहे. 

सावंतवाडी - बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या जिल्ह्यातील तब्बल बाराशे किलोमीटर लांबी असलेल्या राज्य महामार्गाचा ‘ड्रायव्हिंग स्मुथनेस’ डिजिटल तंत्रज्ञानाने तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात प्रमुख राज्यमार्गासह जिल्हा मार्गाचा समावेश आहे. ही प्रक्रिया राबविल्यामुळे ‘बांधकाम’च्या अधिकाऱ्यापासून मंत्रालयात बसणाऱ्या सचिवापर्यंत सर्वांना बसल्याजागी रस्त्याची वस्तुस्थिती कळण्यास मदत होणार आहे. 

ही जबाबदारी डिजिटल रोड बाऊन्स नावाच्या एका कंपनीकडे दिली आहे. यानुसार रस्त्यावर भरधाव वेगाने गाड्या फिरवून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल डिजिटल पद्धतीने शासनाला सादर होणार आहे. त्यामुळे भविष्यात रस्त्यांची कामे सुचविताना या आधुनिक प्रणालीचा वापर करून बनविलेल्या अहवालाचा फायदा होणार आहे. 

सार्वजनिक बांधकामच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याचा दर्जा या 
वर्षीपासून डिजिटल पद्धतीने तपासण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेली तपासणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सद्यस्थिती तपासणी करणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने ‘बांधकाम’च्या रस्त्यावरून फिरताना दिसत आहेत. 

सद्य:स्थिती लक्षात घेता बांधकाम विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यातील सुमारे बाराशे किलोमीटरचा रस्ता ताब्यात आहे. यात राज्यमार्ग, प्रमुख राज्यमार्ग आणि जिल्हामार्गाचा समावेश आहे. याबाबतची जबाबदारी डिजिटल रोड बाऊन्स या कंपनीला देण्यात आली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. येत्या पंधरा दिवसांत याबाबतचा अहवाल थेट वरिष्ठांकडे कंपनीचे कर्मचारी सादर करणार आहेत.

अचूक सूचना मिळणार 
याबाबत ‘बांधकाम’चे कार्यकारी अभियंता प्रकाश बच्चे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात प्रथमच डिजिटल प्रक्रिया राबविण्यात येते. त्यामुळे रस्त्याचा दर्जा आणि गुळगुळीतपणा तपासण्यास मदत होणार आहे. नेमके कोणत्या रस्त्याचे काम करणे आवश्‍यक आहे, याबाबतची अचूक सूचना मिळणार आहे. तसेच थेट मंत्रालयात ही माहिती जोडली गेल्याने त्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांना मिळणार आहे.

यापूर्वी ‘बांधकाम’च्या ताब्यात असलेले रस्ते हे पारंपरिक पद्धतीने तपासले जात होते, मात्र या वर्षीपासून शासनाकडून डिजिटल पद्धत राबविण्यात येत आहे. रस्त्याचा गुळगुळीतपणा तपासणारी यंत्रणा कारमध्ये बसविण्यात येते आणि संबंधित कार वेगाने पळविण्यात येते. या प्रक्रियेनंतर झालेल्या गाडीच्या चाकाची हालचाल लक्षात घेता कोठे डांबरीकरण करणे गरजेचे आहे. याची माहिती संबंधित यंत्रणा थेट डिजिटल पद्धतीने संगणकाकडे देते. त्यानंतर कोठे रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे, याबाबतची माहिती संबंधित यंत्रणा देऊ शकते.
- राजन चव्हाण, सहायक अभियंता, बांधकाम विभाग

Web Title: digital technology for road cheaking