कातळावर फुलणार्‍या कोचवर्गीय फुल वनस्पतीचा कोकणात शोध 

Discovery of cochineal flowering plants in Konkan
Discovery of cochineal flowering plants in Konkan

राजापूर - दक्षिण कोकणातील कातळावर फुलणार्‍या कोचवर्गीय ‘लेपिडागॅस्थिस साबुई चांदोरे, बोरूडे, माधव व एस. आर. यादव’ या नव्या जागतिकस्तरीय फुलवनस्पतीचा शोध लागला आहे. गतवर्षी या प्रजातीतील ‘लेपिडागॅस्थिस श्रीरंगी’ आणि ‘लेपिडागॅस्थिस उषाई’ अशा दोन नव्या फुलवस्पतींचा शोध लागला होता.

कोकणातील काळ्या तुळतुळीत कातळावर फुलणार्‍या जागतिक स्तरावरील फुलवनस्पतींचा शोध गेल्या काही वर्षामध्ये तालुक्यामध्ये लागत असताना त्यामध्ये आता आणखीन एका नव्या फुलवनस्पतीची यामुळे भर पडली आहे. कोच प्रजातीतील ही फुलवनस्पती असून याच्या जगामध्ये 111 प्रजाती आहेत. त्यापैकी 34 प्रजातींचा भारतामध्ये शोध लागला आहे. ‘लेपिडागॅस्थिस साबुई’ या नव्या फुलवनस्पतीचे संशोधन न्यूझीलंड येथून प्रकाशित होणार्‍या ‘फायटोटॅक्सा’ या जागतिक दर्जाच्या नियतकालिकातून गत आठवड्यामध्ये प्रकाशन झाले आहे. 

शहरानजीकच्या रानतळे आदी परिसरामध्ये फिरत असताना ही फुलवनस्पती निदर्शनास आली. त्यानंतर, तिचे सर्व्हेक्षण केल्यानंतर तिची जागतिकस्तरीय नोंद नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव आणि रयत शिक्षण संस्थेच्या राजापूर तालुक्यातील आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अरुण चांदोरे, त्यांचा संशोधक विद्यार्थी देविदास बोरुडे, गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच. पी. टी. व आर. वाय. के. महाविद्यालय, नाशिक येथील संशोधक विद्यार्थी नीलेश माधव यांनी या वनस्पतीचे तीन वर्षे संशोधन केले. राजापूर शहरानजीकच्या रानतळे परिसरासह लांजा, पावससह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, मालवण आदी परिसरातील कातळावर आढळली. या वनस्पतीचा सविस्तर अभ्यास आणि संशोधन केल्यानंतर जागतिकस्तरीय वनस्पती असल्यावर शिक्कामोर्तब झाले. या संशोधनास आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार, प्रा. एस. जी. मेंगाळ, डॉ. शरद कांबळे. डॉ. विनोदकुमार गोसावी आदींचे सहकार्य लाभले तर, नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन मंडळाने मदत केली. या फुलवनस्पतीचे संशोधन करणार्‍या संशोधकांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.  


कातळ भागामध्ये पसरट वाढते

मराठीमध्ये कोच म्हणून नामोल्लेख
गुलाबी रंगाची पाने
वनस्पतीला पहिल्या वर्षी फक्त पाने
पाने 2 ते 3 सेंमी लांब, 3 मी. मी. रुंद
फेब्रुवारी ते एप्रिलला फुले त्यानंतर फळे 
फुलांचा आकार 2.5 सेंमी तुर्‍यामध्ये दहा फुले
फळांमध्ये दोन बिया

असे झाले नामकरण 

केरळमधील कालिकत विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एम  साबू यांच्या नावावरून या फुलवनस्पतीला हे नाव देण्यात आले आहे. डॉ. साबू यांचे फुलवनस्पतीच्या संशोधनामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. आले, हळद वर्गातील संशोधनामध्ये त्यांचे योगदान आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com