शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे राष्ट्रवादी प्रेम पुन्हा चर्चेत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

चिपळुणातील एका कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र आले होते.

चिपळूण ( रत्नागिरी) - गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला असला तरी त्यांचे राष्ट्रवादीतील नेते आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम कायम आहे. राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी खेर्डीतील दिशा दाभोळकर यांची निवड झाल्यानंतर जाधवांनी दाभोळकर यांना अभिनंदनाचे पत्र पाठवले. सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाल्यानंतर जाधवांचे राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांवर असलेले जिव्हाळ्याचे प्रेम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

चिपळुणातील एका कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र आले होते. सुरवातीला भाषण करताना भास्कर जाधव यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. तसेच दादांचा मला फोनही आल्याचे सांगत मतदार संघातील विकासकामाच्या बाबतीत त्यांच्यासोबत चर्चाही केल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले होते.

त्यामुळे भास्कर जाधवांनी राष्ट्रवादी सोडली तरी त्यांचे राष्ट्रवादीतील नेत्यांबरोबर अजूनही मैत्रीचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले होते. आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्नावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चिपळूणला आले होते. त्या वेळी भास्कर जाधवांनी दोघांना घरी जेवण घातले होते. 

राष्ट्रवादीच्या जवळीकीची चर्चा 
विधानसभा निवडणुकीपूर्वी भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला; मात्र निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करताच शिवसेनेने भास्कर जाधव यांचा अपेक्षाभंग करत त्यांना मंत्रिमंडळात डावलले. त्यामुळे नाराज झालेल्या भास्कर जाधव यांनी थेट पक्षाच्या नेतृत्वावरच आगपाखड केली होती. या पार्श्वभूमीवर जाधव यांची पुन्हा राष्ट्रवादीशी जवळीक वाढत आहे की काय? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion OF Guhagar Shivsena MLA Bhaskar Jadhav Loves With NCP