ग्रामसभा तहकुबीवरून बोडणला राडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

प्रजासत्ताकदिनी दोन गटांत वाद; परस्‍परविरोधी तक्रारी, पाच जणांवर गुन्‍हा
दोडामार्ग - शिरंगे प्रकल्पग्रस्तांच्या बोडण ग्रामपंचायतीत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेनंतर ग्रामस्थांच्या दोन गटांत राडा झाला. काही काळ झालेल्या धक्काबुक्की, शिवीगाळ व मारहाणीच्या घटनेनंतर दोन्ही गटांनी पोलिस ठाणे गाठत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या. त्या प्रकरणी एकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा तर दुसऱ्या तक्रारीनुसार चार जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वारंवार ग्रामसभा तहकूब होत असल्याच्या कारणावरून विचारलेल्या जाबाचे पर्यवसान मारामारीत झाल्याचे सांगण्यात आले.

शिरंगे प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन वसाहत खानयाळे येथे आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी मंजूर ग्रामपंचायत बोडण या नावाने अस्तित्वात आली आहे. ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून सगळ्या ग्रामसभा कोरमअभावी तहकूब होतात. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा 
होत नाही. 

प्रजासत्ताक दिनाची ग्रामसभाही कोरमअभावी तहकूब झाली. त्यामुळे काही ग्रामस्थांनी सरपंच प्रकाश गवस यांना वेळोवेळी ग्रामसभा तहकूब होत असल्याचा जाब विचारला. त्यावरून बाचाबाची झाली. त्यातच सर्वजण समाजमंदिरातील सभास्थळ सोडून बाहेर पडले.

या वेळी शशिकांत पांडुरंग गवस यांनी आपल्या मनात लज्जा उत्पन्न होईल, अशी शिवीगाळ केल्याची तक्रार सरपंच गवस यांची पत्नी सौ. ज्योती गवस यांनी केली. अश्‍लील शिवीगाळ करण्याबरोबरच शशिकांत गवस यांनी आपल्याला मारहाण केल्याचीही सौ. गवस यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शशिकांत गवस यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शशिकांत गवस यांनीही सरपंचांची पत्नी सौ. ज्योती गवस, रंजिता रवींद्र घाडी, विशाखा विजय घाडी व विजय कृष्णा घाडी या चौघांविरोधात दोडामार्ग पोलिस ठाण्यात त्या चौघांनी मारहाण केल्याची तक्रार दिली. त्यानुसार त्या चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या ग्रामसभेदरम्यान बाचाबाची व नंतर झालेल्या राड्यानंतर दोडामार्ग पोलिस ठाणे व परिसरात दोन्ही गटांतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

गटातटाचे दर्शन...
शिरंगे येथून विस्थापित प्रकल्पग्रस्तांमध्ये मधल्या काळात गटातटाचे दर्शन घडत होते. त्यामुळे शासकीय नुकसान भरपाईसुद्धा अन्य प्रकल्पग्रस्तांच्या तुलनेत यांना वेळेत मिळाली नाही. पुनर्वसन आणि ग्रामपंचायत झाल्यानंतरही ते सर्वजण गटतट विसरून गावच्या विकासासाठी प्रयत्न करतील असे वाटत होते; पण क्षुल्लक कारणावरून आजही गटबाजीचे दर्शन घडते आहे. विस्थापित प्रकल्पग्रस्तांनी सर्वस्व हरवल्याची जाणीव ठेवून नव्याने उभे राहण्याची जिद्द बाळगायला हवी; पण तसे होताना दिसत नसल्याने पुन्हा एकत्र येऊन विकास करण्याचा विचार ग्रामपंचायत आणि प्रकल्पग्रस्तांनी करणे आवश्‍यक आहे.

Web Title: dispute in bodan village