ऑनलाईनचा डाव ठरला भारी़, बीओटी काॅम्प्लेक्सला खडाजंगीत घेतली मंजुरी, कोकणातील कुठल्या पालिकेत घडला प्रकार

रुपेश हिराप
Friday, 11 September 2020

यापूर्वीही पी.पी.पी. तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्‍स उभारण्यावरून विरोधकांनी तीव्र विरोध केला होता. 

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : ऑनलाईन ठरलेली सावंतवाडी पालिकेची मासिक बैठक ऑफलाईन घेण्यात आली. त्याच दरम्यान विरोधकांचे सहा नगरसेवक सभेला आलेच नाहीत. ऑनलाईन-ऑफलाईनची खेळी यशस्वी करीत सत्ताधाऱ्यांनी सावंतवाडीत बीओटी तत्वावर उभारण्यात येणाऱ्या कॉम्प्लेक्‍सला मंजुरीचा याच बैठकीत मंजूर केला.

शहरात बीओटी तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या दुसऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्‍सवरून गुरूवारी येथील पालिकेच्या मासिक बैठकीत सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकच खडाजंगी झाली. यापूर्वीही पी.पी.पी. तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्‍स उभारण्यावरून विरोधकांनी तीव्र विरोध केला होता. 

हे कॉम्प्लेक्‍स उभारण्याबाबत आम्हाला विश्‍वासात घेतले नाही, असा आरोप करत विरोधी गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी कॉम्प्लेक्‍सच्या ठरावाला विरोध केला तर शिवसेनेची सत्ता असणाऱ्या मुंबईसारख्या शहरांमध्ये 63 टक्‍के प्रकल्प बीओटीवर होत असताना ते सावंतवाडीत का नको, असा पलटवार नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. अखेर हा ठराव 9 विरुद्ध 3 अशा फरकाने संमत झाला. यावेळी शिवसेनाप्रणित गटाच्या सहा नगरसेवकांची अनुपस्थिती राजकीय चर्चेचा विषय ठरली. 

येथील पालिकेची मासिक बैठक नगराध्यक्ष परब यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्याधिकारी संतोष जिरगे उपस्थित होते. महावितरण कार्यालयाच्या शेजारी असलेल्या खत प्रकल्पाच्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्‍स उभारण्याबाबतच्या विषयाला शिवसेना, भाजप, अपक्ष गटाच्या सदस्यांनी विरोध करावा, असा व्हिप गटनेत्या ज्येष्ठ नगरसेविका लोबो यांनी बजावला होता; मात्र व्हीप बजावलेल्या सदस्यांपैकी सहा सदस्यच अनुपस्थित राहिले. त्यामुळे विरोधकांची खेळी वाया गेली. तरीही बैठकीत शॉपिंग कॉम्प्लेसवरून गटनेत्या लोबो व डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच सुनावले. 

ज्या 24 गुंठे जागेमध्ये कॉम्प्लेक्‍स उभा राहणार आहे, तेथील अनेक दुकानदार, व्यापाऱ्यांवर अन्याय होणार आहे. शिवाय हा शॉपिंग कॉम्प्लेक्‍स उभारण्यामध्ये विरोधक म्हणून आम्हाला विश्‍वासात घेण्यात आले नाही. दुसरीकडे बीओटी तत्त्वावर कॉम्प्लेक्‍स उभारला गेल्यास पालिकेचे नुकसान होणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे कर्ज न घेता शासकीय निधीच्या माध्यमातून हा कॉम्प्लेक्‍स उभारला जावा. कॉम्प्लेक्‍स उभारताना नेमक्‍या काय त्रुटी येणार आहेत, कोणाला अडचण होणार आहे, याबाबत विचार केला जावा, असे स्पष्ट केले. 
यावर नगराध्यक्ष परब म्हणाले, ""कॉम्प्लेक्‍स उभारताना ज्यांची दुकाने व ज्या व्यापाऱ्याचे गाळे जाणार आहेत, त्यांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. मुंबईसारख्या शिवसेनेची सत्ता असलेल्या शहरांमध्ये आज 63 टक्‍के प्रकल्प बीओटी तत्त्वावर होत आहेत. शासनाकडून निधी उपलब्ध होत नसताना किंवा शासनाच्या तिजोरीत खडखडाट असताना सावंतवाडीमध्ये बीओटी तत्त्वावर प्रकल्प का उभारू नये?'' 

यावेळी नगरसेवक डॉ. परुळेकर यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्‍स उभारण्यापेक्षा पालिकेने हॉस्पिटल, दवाखाने उभारण्याची गरज असल्याचे सांगितले. श्री. परुळेकर यांच्या विधानावरून मनोज नाईक व नासिर शेख आक्रमक झाले. गेली पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता असताना त्यांनी हॉस्पिटल उभारण्याबाबत का रस दाखवला नाही, याचे आधी उत्तर द्या, असे सुनावले. त्यामुळे शॉपिंग कॉम्प्लेक्‍सच्या विषयावरून खडाजंगी झाली. डॉ. परुळेकर म्हणाले, ""कोरोनाची साथ जनतेला बरंच काही शिकवून गेली आहे. हे संकट अजून दोन वर्ष चालणार आहे. त्यामुळे शॉपिंग कॉम्प्लेक्‍सपेक्षा हॉस्पिटलची गरज इथल्या लोकांना जास्त आहे.'' 

कंटेनर थिएटरच्या जागेसाठी पंधरा हजार रुपये दर करण्यात यावा, असा ठराव ज्येष्ठ नगरसेवक राजू बेग यांनी मांडला. यावर लोबो यांनी संबंधित जागा सांस्कृतिक गोष्टीसाठी आरक्षित असल्याने सर्व गोष्टीचा योग्य विचार करून रितसर पद्धतीने कंटेनर थिएटर उभारले जावे, असे स्पष्ट केले. त्यावर परब म्हणाले, ""कंटेनर थिएटरची जागा मुळात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आरक्षित नाही. याचा आधी अभ्यास करावा. कंटेनर थिएटर उभारताना त्या भागातील लोकांना ये-जा करण्यासाठी बारा मीटर रस्ता सोडला जाणार आहे. तेथे रस्ता नसतानाही किंवा तशी नोंद पालिकेच्या रेकॉर्डमध्ये नसतानाही नागरिकांसाठी जागा सोडली जाणार आहे.'' यावेळी लोबो यांनी कोणालाही अडथळा होऊ नये व योग्य पद्धतीने, अधिकृतरित्या कंटेनर थिएटर उभारल्यास आमचा कोणताही विरोध नसल्याचे स्पष्ट केले. 

आणखी लॉकडाउनची गरज नाही 
शहरामध्ये आणखी लॉकडाऊन करण्यास व्यापारी संघाचा विरोध असून लॉकडाउनची गरज नसल्याचे नगराध्यक्षांनी यावेळी सांगितले. कोरोनाची साखळी तुटण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. या वेळी डॉ. परुळेकर यांनी सोशल डिस्टन्स, मास्क व घालून दिलेले नियम नागरिकांना अनिवार्य करा, व्यापाऱ्यांना नियम घालून द्या, अशी मागणी केली. ही मागणी मान्य करण्यात आली. 

सभा बेकायदेशीर असल्याचा दावा 
सभेच्या सुरुवातीला अनारोजीन लोबो यांनी आजची सभा ऑनलाईन होणार असताना व तसा मेसेज आम्हाला दिला असताना अचानक ऑफलाईन का घेण्यात आली? त्यामुळे ही सभा बेकायदेशीर असल्याचे सांगितले; मात्र नगराध्यक्ष म्हणून ही सभा ऑफलाईन बोलावण्याची अधिकार आपल्या अखत्यारित सांगत परब यांनी विषय पुढे रेटला. 

कुठे होणार नवा कॉम्प्लेक्‍स? 
पालिकेच्या व्यापारी संकुलनाच्या मागच्या बाजूला महावितरणच्या कार्यालयाला लागून उभारण्यात आलेल्या खत प्रकल्पाच्या ठिकाणी एकूण 24 गुंठे जागा आहे. तेथे नवरात्रोत्सवात देवी बसविण्यात येणाऱ्या जागेपासून पुढे चंदू भुवन हॉटेलला लागून असलेल्या पालिकेच्या जागेत कॉम्प्लेक्‍स उभे राहणार आहे. सध्या या जागेत अनेक छोटी मोठी दुकाने आहेत. 

संपादन ः विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute over BOT complex in the monthly meeting of Sawantwadi Municipality