राष्ट्रवादी स्वबळावर : काँग्रेसने परस्पर यादी जाहीर केल्याने नाराजी

अमोल टेंबकर : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

सावंतवाडी - युती तुटल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी फिस्कटल्यात जमा आहे. काँग्रेसकडून समाधानकारक प्रतिसाद नसल्याने स्वबळावर लढण्याचे आदेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे; मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीला सगळ्याच जागा लढविणे कठीण आहे. यापूर्वी गाफील असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आता उमेदवार शोधावे लागणार आहेत. आघाडी तुटल्याच्या वृत्तास जिल्हाध्यक्ष व्हिक्‍टर व्हिक्‍टर डान्टस यांनी दुजोरा दिला.

सावंतवाडी - युती तुटल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी फिस्कटल्यात जमा आहे. काँग्रेसकडून समाधानकारक प्रतिसाद नसल्याने स्वबळावर लढण्याचे आदेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे; मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीला सगळ्याच जागा लढविणे कठीण आहे. यापूर्वी गाफील असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आता उमेदवार शोधावे लागणार आहेत. आघाडी तुटल्याच्या वृत्तास जिल्हाध्यक्ष व्हिक्‍टर व्हिक्‍टर डान्टस यांनी दुजोरा दिला.

57 वरून 24 जागांवर आलो तरीही...
श्री. डान्टस यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""सद्यस्थिती लक्षात घेता प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी स्वबळावर लढायचे आहे. त्यामुळे तयारीला लागा, असे आदेश दिले आहेत. आम्ही आघाडी होणार या विश्‍वासावर होतो, मात्र काँग्रेसकडून आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आम्ही आमचा मार्ग धरला आहे. चर्चेदरम्यान आम्ही 15 जिल्हा परिषदच्या जागा आणि 42 पंचायत समितीच्या जागा मागितल्या होत्या. अंतिम टप्प्यात आठ जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीच्या जागेवर आलो होतो; मात्र आता पर्यत आम्हाला सकारात्मक निर्णय मिळालेला नाही. त्यामुळे पक्षाकडून दिलेल्या आदेशानुसार आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरवात करण्यात आली आहे.''

जिल्ह्यातील पालिका निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करून लढल्या होत्या. त्या ठिकाणी राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नव्हते. काँग्रेसला चांगली संधी मिळाली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकात यांची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा होती. एकीकडे शिवसेना भाजपची युती तोडण्याचे आदेश पक्षप्रमुखांनी दिल्यानंतर आघाडीचे नेते आनंदात होते. युती तुटल्याचा फायदा नक्कीच आघाडीच्या पचनी पडेल, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे आघाडी होईल, या भरवशावर राष्ट्रवादीचे अनेक नेते होते. या बाबतचा अखेरचा निर्णय मात्र काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याकडे देण्यात आला होता. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक असताना आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.

राष्ट्रवादीपेक्षा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद असल्यामुळे तसेच आमच्या पक्षाकडे ताकदवान उमेदवार असल्यामुळे स्वबळावर निवडणुका लढविण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आली होती. सावंतवाडीत आलेल्या श्री. राणे यांनी राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या येवढे जिल्ह्यातील नेते आघाडीसाठी इच्छुक नाहीत, असे विधान करीत आघाडी करू मात्र जागांबाबत आता काही बोलणार नाही, असे सूचक विधान केले होते; मात्र काल अचानक काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना विश्‍वासात न घेता थेट उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. यात राष्ट्रवादीने दावा केलेल्या काही जागांवर उमेदवार देण्यात आले. तर काही जागा मागे ठेवण्यात आल्या. त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेने राष्ट्रवादीचे नेते डिवचले आहेत. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या नजरेस आणून दिली. काँग्रेसने राष्ट्रवादीला गृहीत धरल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार काही झाले तरी आता स्वबळावर लढण्याची तयारी करा, असे वरिष्ठांकडून सांगण्यात आल्याचे कळते.

आघाडीसाठी अजूनही चर्चेची तयारी
या बाबत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, ""आघाडी फिस्कटली किंवा राष्ट्रवादी स्वबळावर लढत आहे, याबाबत आपल्याला काही माहिती नाही, मात्र आमची अजूनही चर्चा सुरू आहे. आघाडीसाठी आमची तयारी आहे. त्या संदर्भात बोलणी सुरू आहेत.''

दोडामार्गात आघाडी
जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्‍यता कमी असली तरी दोडामार्गात मात्र आघाडी निश्‍चित झाली आहे. तशी माहिती दोन्ही पक्षाच्या तालुकाप्रमुखांनी दिली आहे.

Web Title: Disputes in NCP and Congress