घराघरात शौचालय बांधण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

अलिबाग - रायगड जिल्ह्यातील अनेक वस्त्यांमध्ये; तसेच वाड्यांवर आजही पुरेशी वैयक्तिक; तसेच सार्वजनिक शौचालये नसल्याने नागरिक उघड्यावर शौचास बसत आहेत. जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने दिलेल्या माहितीनुसार 16 टक्के नागरिक उघड्यावर शौचास बसतात. त्यामुळे रस्ते आणि मैदानांची हागणदारी झाली आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना वेळोवेळी साथीच्या आजारांचा सामनाही करावा लागतो. यावर उपाय म्हणून प्रत्येक घराघरात शौचालय असावे, यासाठी जिल्हा परिषदेचा स्वच्छता विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारा रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. अनेक प्रकल्प जिल्ह्यात येऊ घातले आहेत; मात्र आजही अनेक गावांमध्ये प्राथमिक सोई-सुविधांचा अभाव आहे. गावात पुरेशी शौचालये नसल्याने नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. महिलांची तर कुचंबणा होते.

हागणदारीमुक्तीसाठी घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. शौचालयाचे फायदे नागरिकांना समजावून सांगण्यात येत आहेत. स्वच्छता विभागाच्या या प्रयत्नांना यश मिळत असले, तरी रायगड जिल्हा पूर्णपणे हागणदारीमुक्त झालेला नाही.

म्हसळा आघाडीवर
जिल्ह्यात म्हसळा तालुक्‍यातील नागरिक वैयक्तिक शौचालये बांधण्यात आघाडीवर आहे. या तालुक्‍यातील 39 ग्रामपंचायतींमध्ये 10 हजार 991 कुटुंबे आहेत. त्यापैकी 10 हजार 720 कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये आहेत. सर्वात कमी वैयक्तिक शौचालये कर्जत तालुक्‍यात आहेत. तेथील 50 ग्रामपंचायतींमध्ये 31 हजार 916 कुटुंबे आहेत. त्यातील 17 हजार 624 कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये आहेत.

स्वच्छतेच्या आघाडीवर
- वैयक्तिक शौचालय वापरणारे नागरिक : 74 टक्के
- सार्वजनिक शौचालये वापरणारे नागरिक : 10 टक्के
- उघड्यावर शौचास बसणारे : 16 टक्के

शौचालयाचे लाभ
- गावाबाहेर जाण्याच वेळ वाचतो.
- स्त्रियांची उघड्यावर बसण्याची कुचंबणा टळते.
- रात्री-अपरात्री बाहेर जाण्याचा धोका टळतो.
- उत्तम प्रतीचे खत तयार करता येऊ शकते.
- कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा उंचावते.
- परिसरार, गावात स्वच्छता वाढते.
- रोगराईला आळा बसतो.

उघड्यावरील विष्ठेपासून आजार
- विषाणूजन्य : पोलिओ, कावीळ.
- जीवाणूजन्य : अतिसार, कॉलरा, हगवण, गॅस्ट्रो, विषमज्वर.
- अनेक प्रकारचे जंत व त्यापासून होणारे आजार.

Web Title: District Council to build dwellings toilet