योग्य वेळ येईल तेव्हा बोलणार - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

गेले महिनाभर कोणतीही जाहिरात न देता मी सर्वच चॅनलवर दिसतो आहे. मला तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे बळ मिळाल्यानेच मी आतापर्यंत अनेक पदे भूषविली. कार्यकर्त्यांच्या मनात माझे स्थान आहे. त्यांची साथ जोपर्यंत आहे, तोपर्यंत मी राजकारणात सक्रिय राहणार आहे आणि यशस्वी होणारच.
- नारायण राणे, आमदार

सिंधुदुर्गनगरी - मी कधीही कोणता निर्णय घेण्यास आणि काही बोलण्यास घाबरत नाही; मात्र आजच्या या स्नेहसंमेलनामध्ये मी काही बोलणार नाही. योग्य वेळी बोलेन. माझा निर्णय महाराष्ट्र राज्य, कोकण आणि कोकणी माणसाच्या हिताचाच असेल, असे काँग्रेस नेते आमदार नारायण राणे यांनी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय स्नेहसंमेलनात बोलताना सांगितले.

जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस आयोजित सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचे आयोजन रविवारी पडवे येथील मेडिकल कॉलेजच्या मैदानावर केले होते. या वेळी विविध कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी आपली कला सादर केली. कार्यक्रमाच्या मध्यंतरात आमदार राणे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी नीलम राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्‍मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, विकास सावंत, संग्राम प्रभुगावकर, अशोक सावंत, मधुसुदन बांदिवडेकर यांच्यासह बहुसंख्य काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसच्या काल (ता. २३) झालेल्या जिल्हास्तरीय स्नेहसंमेलनात श्री. राणे काय बोलणार याबाबत उत्सुकता होती; मात्र या मेळाव्यात नारायण राणे यांनी राज्यभर रंगलेल्या राणेंच्या राजकीय वाटचालीचे सस्पेन्स वाढवत मी कधीही कोणता निर्णय घेण्यास आणि बोलण्यास घाबरत नाही. योग्य वेळ येईल तेव्हा बोलणारच आहे; मात्र माझा निर्णय महाराष्ट्र राज्य, कोकण आणि कोकणी माणसाच्या हिताचाच असेल; परंतु आजच्या या स्नेहमेळाव्यात मी याबाबत काही बोलणार नाही, असे स्पष्ट करून राज्यभर रंगलेल्या चर्चेचे गूढ अधिकच वाढविले आहे.

श्री. राणे म्हणाले, ‘‘सांस्कृतिक कार्यक्रम हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. या दृष्टीनेच त्याकडे पाहा. कोणी कुणाची नक्कल केली असेल तर अपमान मानू नका.  यामध्ये कलाकारांच्या अभिनयाला दाद द्यायला हवी. हा कार्यक्रम कोणाची मने दुखावण्यासाठी नाही. या कार्यक्रमात माझ्यावरही कलाकारांनी नकला करून या कार्यक्रमात रंगत आणली. त्यांचे मी मनापासून कौतुक करतो.’’

काँग्रेसच्या स्नेहमेळाव्यातील गीतांची मैफल, हास्यविनोदी चुटके यांच्या मिलाफाने रविवारची संध्याकाळ काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी चैतन्य देणारी ठरली. या स्नेहसंमेलनातील कार्यक्रमात काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या अभिनयातील भविष्यवाणी चांगलीच रंगली. महाराष्ट्राचा जाणता राजा आणि त्यांची वानरसेना अशी भविष्यवाणी करीत संतोष कानडे व मधुसूदन बांदिवडेकर यांनी स्नेहसंमेलनात रंगत आणली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित राणे यांच्यासह पदाधिकारी यांनी गायिलेली गाणी आणि महिला कार्यकर्त्यांच्या नृत्याने या कार्यक्रमात अधिकच रंगत आणली. हे स्नेहसंमेलन म्हणजे राणेसमर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी नवी संजीवनी देणारे ठरले.

Web Title: District Level Honor of Congress