खेर्डी सरपंचांविरोधात अविश्‍वास ठराव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

चिपळूण - चिपळूणसह जिल्ह्यात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून खेर्डी ग्रामपंचायतीची ओळख आहे. खेर्डीच्या सरपंचांविरोधात ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १४ सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्‍वास ठराव दाखल केला. सदस्यांना विश्‍वासात न घेता कामकाज व मनमानी कारभार केल्याचा आरोप प्रस्तावात नमूद आहे. या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयद्रथ खताते यांना होमपीचवरच जबरदस्त धक्का बसला आहे.

अविश्‍वास ठरावावर मतदान होण्यासाठी येत्या आठवड्यात ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा होणार आहे. तालुक्‍यात सर्वाधिक श्रीमंत असलेल्या खेर्डी ग्रामपंचायतीवर ‘राष्ट्रवादी’चे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांची एकहाती सत्ता आहे. सलग १५ वर्षे कसोशीने खतातेंनी सत्ता राखली होती. मात्र, पंचायत समिती निवडणुकीपासून खताते गटात संघर्षाची ठिणगी पडली. गेल्या दोन महिन्यांपासून सरपंचपदावरून धुमशान सुरू होते.

सरपंच जयश्री खताते या सदस्यांना विश्‍वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात. यामुळे सत्ताधाऱ्यातील एक गट फुटला. त्यांनी स्वतंत्र गट केला. परिणामी शिवसेनेच्या विरोधी सदस्यांनीही त्यांना मदत केली. गेल्याच आठवड्यात सरपंचावर अविश्‍वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सुरू होत्या.

अविश्‍वास दाखल होऊ नये, यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अंतर्गत बैठकही झाली. मात्र, त्यात तोडगा निघाला नाही. परिणामी आज सरपंच खताते यांच्या विरोधात १७ पैकी १४ सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला. ठराव दाखल करण्यासाठी सदस्य तहसील कार्यालयात सायंकाळी साडेचारच्या सुमारास पोहोचले. तहसीलदार जीवन देसाई यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. दरम्यान, दाखल झालेल्या ठरावावर मतदान होण्यासाठी सात दिवसांत खेर्डी ग्रामपंचायतीत विशेष सभेचे आयोजन करण्यात येईल. त्यावेळी या ठरावावर सदस्य मतदान करणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distrust treaty against Kherde Sarpanch