संगमेश्वर : लाच घेताना मंडल अधिकारी, तलाठी जाळ्यात

संदेश सप्रे
बुधवार, 17 जुलै 2019

  • वारस तपासण्यासाठी तालुक्यातील मुरडव मंडल अधिकारी आणि तुरळ तलाठी लाच घेताना जाळ्यात.
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मंगळवारी संध्याकाळी कारवाई.
  • मुरडवचे मंडल अधिकारी अजय यशवंत तांबे (55, रत्नागिरी), तलाठी विश्‍वंभर पंडीत मुरकुटे (32, आरवली) अशी पकडण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची नावे
  • तांबे यांना रोख रुपये 4 हजार तर मुरकुटे यांना रोख रूपये 2 हजार घेताना पकडले.

संगमेश्‍वर - वारस तपासण्यासाठी तालुक्यातील मुरडव मंडल अधिकारी आणि तुरळ तलाठ्यांना लाच घेताना पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी संध्याकाळी ही कारवाई केली. मुरडवचे मंडल अधिकारी अजय यशवंत तांबे (55, रत्नागिरी), तलाठी विश्‍वंभर पंडीत मुरकुटे (32, आरवली) अशी पकडण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. यातील तांबे यांना रोख रुपये 4 हजार तर मुरकुटे यांना रोख रूपये 2 हजार घेताना पकडण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकाराबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकात, या प्रकरणातील तक्रारदार यांची मौजे तुरळ गावात त्यांच्या तसेच मयत आई यांच्या संयुक्त नावाने जमिन आहे. ही जमिन शासनाने मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अधिग्रहीत केली आहे. यामुळे याची नुकसानभरपाई मिळवण्यासाठी वारस तपास होणे गरजेचे होते. याकरिता तक्रारदार यांनी या जमिनीचा वारस तपास होऊन त्यात स्वतःचे आणि त्यांचा मयत भाऊ यांच्या वारसाचे नाव लावण्यात यावे यासाठी तलाठी कार्यालय तुरळ येथे रितसर प्रक्रिया केली होती.

या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी तुरळ येथेच मंडल अधिकारी तांबे आणि तलाठी मुरकुटे यांची भेट घेतली. या भेटीत तांबे यांनी हे काम करण्यासाठी 4 हजार तर मुरकुटे यांनी या कामासाठी 2 हजार रूपयांची लाच मागितली. त्यानुसार तक्रारदार यांनी 15 जुलै रोजी लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

या तक्रारीच्या अनुषंगाने 16 जुलै रोजी संबधित विभागाने पडताळणी केली असता दोघांनीही ही रक्कम मागीतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लागलीच सापळा रचण्यात आला. संध्याकाळी पाच वाजता तक्रारदार रक्कम देण्यासाठी संंबंधीत कार्यालयात गेले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी त्याठिकाणी होते. ही रक्कम स्विकारताना दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक श्री कदम, निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप ओगले, संतोष कोळेकर, पोलिस नाइक विशाल नलावडे, पोलिप शिपाई दीपक आंबेकर यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divisional officar, Talthi arrested in Bribe case in Sangmeshwar