धबधब्यांवर अतिवृष्टीच्या काळात जाण्यास करण्यात येणार मनाई

राजेश कळंबटे
सोमवार, 9 जुलै 2018

पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या जिल्ह्यातील धबधब्यांवर अतिवृष्टीच्या काळात जाण्यास मनाई करण्यात येणार असून तेथे पोलिस तैनात करण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला आहे. सवतकडा (ता. राजापूर) येथील प्रकारानंतर सोमवारी (ता. 9) तातडीच्या बैठकीत उपाययोजनांवर चर्चा झाल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी सांगितले.

रत्नागिरी- पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या जिल्ह्यातील धबधब्यांवर अतिवृष्टीच्या काळात जाण्यास मनाई करण्यात येणार असून तेथे पोलिस तैनात करण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला आहे. सवतकडा (ता. राजापूर) येथील प्रकारानंतर सोमवारी (ता. 9) तातडीच्या बैठकीत उपाययोजनांवर चर्चा झाल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक प्रणय अशोक यांच्यासह अन्य अधिकारीही उपस्थित होते. सवतकडा धबधब्यावर पर्यटकांचा जीव धोक्यात आला होता. सुदैवान त्यात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. भविष्यात असे प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद, तहसिल प्रशासन आणि ग्रामपंचायतीला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. नदीच्या उगमाजवळ पाऊस पडला की धबधब्याचे पाणी क्षणात वाढते. तोच प्रकार सवतकडा येथे घडला.

अचानक वाढलेले पाणी पर्यटकांच्या लक्षात आलेले नाही. हवामान विभागाकडून अतिवृष्टी होत असल्याचा अंदाज काही दिवस आधीच वर्तविला जातो. त्या काळात धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात येणार आहे. काठावर पर्यटक जाऊन मौजमजा करु शकतील; परंतु त्यांना पाण्यात उतरता येणार नाही. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी अतिवृष्टींचा संदेश असलेल्या काळात धबधब्यांवर पोलिसांची नियुक्ती केली जाईल. जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडून धोक्याच्या ठिकाणी बॅरिगेटस् आणि फलक लावण्यात येणार आहेत. जिल्ह्यात बावीस धबधबे असून त्यातील सात प्रसिध्द आहेत. तेथे पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. सवतकडा, उक्षी, निवळी, पानवल, धुतपापेश्‍वर यांचा समावेश आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पर्यटन विकास महामंडळामार्फत त्या धबधब्यांची यादी जाहीर केली जाईल. अतिवृष्टीची सूचना आल्यानंतर ती जाहीर प्रसिध्दी दिली जाईल.

‘रत्नदुर्ग’च्या सदस्यांचा सत्कार
सवतकडा धबधब्यात अडकलेल्यांची सुरक्षीत सूटका करणार्‍या रत्नदुर्ग माऊंटेनिअरिंगच्या सदस्यांचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी अभिनंदन केले आहे. त्या पर्यटकांसाठी देवदूत ठरलेल्या सदस्यांचा जिल्हाप्रशासनाकडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे, असे घोरपडे यांनी सांगितले.

Web Title: Do not allow the waterfalls to go in period of the rainy season