हत्तींना रोखण्यासाठी आता कणकीच्या बेटांचा आधार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

वेशीवर लागवड - हेवाळे-बाबरवाडी, कोनाळ, बांबर्डेमध्ये उपक्रम 

दोडामार्ग - हत्तींना मानवी वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी वन विभागाने आता हत्ती उपद्रवग्रस्त गावांच्या वेशीवर कणकीची बेटे लावण्यास सुरवात केली आहे. कोनाळचे वनपाल दत्ताराम देसाई यांनी सहायक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक व वनक्षेत्रपाल सचिन आठवले यांच्या हस्ते कणकीबांबूची रोपे लावून कणक लागवड उपक्रमाची सुरवात केली. हेवाळे-बाबरवाडी, कोनाळ आणि बांबर्डे येथे कणक लागवड करण्यात येत आहे.

वेशीवर लागवड - हेवाळे-बाबरवाडी, कोनाळ, बांबर्डेमध्ये उपक्रम 

दोडामार्ग - हत्तींना मानवी वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी वन विभागाने आता हत्ती उपद्रवग्रस्त गावांच्या वेशीवर कणकीची बेटे लावण्यास सुरवात केली आहे. कोनाळचे वनपाल दत्ताराम देसाई यांनी सहायक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक व वनक्षेत्रपाल सचिन आठवले यांच्या हस्ते कणकीबांबूची रोपे लावून कणक लागवड उपक्रमाची सुरवात केली. हेवाळे-बाबरवाडी, कोनाळ आणि बांबर्डे येथे कणक लागवड करण्यात येत आहे.

कर्नाटकातील दांडेली येथील अभयारण्यातून २००२ मध्ये हत्तींचा एक कळप पाणी व खाद्याच्या शोधात माण मार्गे मांगेलीत आला. ७ ऑक्‍टोबर २००२ मध्ये मांगेलीतील शेती बागायतीत त्याचा वावर आढळला. तिलारी धरणाच्या कुशीत आणि कर्नाटक सीमेवरील मांगेली गाव शेती बागायतीने समृद्ध असलेले; त्यामुळे कर्नाटकातील हत्ती प्रथम मांगेलीत आले. धरणाचा तुडुंब निळाशार जलाशय, जलाशयाभोवती हिरवेगर्द निबीड अरण्य, त्यात हत्तींना आवडणारी कणकीची शेकडो बेटे, धरणामुळे विस्थापित झालेल्या पाल, पाट्ये, आयनोडे, सरगवे, शिरंगे गावात फणसाची असंख्य झाडे, शिवाय आजुबाजूच्या गावात वस्तीलगत माड, केळी, पोफळीच्या बागा आणि भातशेती यामुळे हत्तींचा कळप येथे स्थिरावला.

सद्यस्थितीत हत्तींना आवडणारे कणकीचे कोंब कणकीची बेटे फुलून नष्ट झाल्याने हत्तींना मिळेनासे झालेत. कणकीच्या बेटातील मोकळ्या जागेत बहुतेकवेळा हत्ती विश्रांती घेतात; तेही आता थांबले. त्यामुळे मानवी वस्तीजवळ हत्तींचा वावर वाढला. सद्यस्थितीत हत्तींचा केवळ आयनोडे-हेवाळे या एकाच गावात अधूनमधून उपद्रव सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या बंदोबस्ताची मागणी जोर धरत आहे. काही जणांकडून हत्ती पकड मोहिम राबवण्याची मागणी होत आहे, तर काही जणांना हत्ती पकडून अन्यत्र सोडले तरी दुसरे हत्ती पुन्हा येणारच याचा विश्‍वास असल्याने त्यांची अभयारण्याची मागणी आहे.

तेरवण मेढे येथील वन संशोधन केंद्रात त्यांनी कणकबांबूची हजारो रोपे तयार केली आहेत. श्री. पुराणिक व श्री. आठवले यांच्या हस्ते काही रोपांची लागवड करुन श्री. देसाई यांनी कणक लागवड उपक्रमाची सुरवात केली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ती सर्व रोपे कोनाळ, बांबर्डे आणि हेवाळे-बाबरवाडी परिसरात लावण्यात येणार आहेत.

नुकसान कमीत कमी व्हावे हा हेतू
खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री दीपक केसरकर ‘हत्ती हटाव’साठी आग्रही आहेत; तर वन विभाग आणि राज्यशासन हत्ती पिटाळण्याऐवजी हत्ती पोसण्याबाबत सकारात्मक आहेत. त्यासाठी वन्य हत्तींकडून शेतकऱ्यांचे नुकसान कमीत कमी व्हावे, हत्ती मानवी वस्तीपासून दूर राहावेत, तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्रातच हत्ती स्थिर व्हावेत यासाठी वेगवेगळे पर्याय वन विभाग काढत आहे. बुडित क्षेत्र व बाहेरील क्षेत्रात आणि वन विभागाच्या जागेत हत्तींना आवडणारे खाद्य निर्माण करून त्यांना मानवी वस्तीत जाण्यापासून रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी कणक लागवडीचा निर्णय घेतला आहे.

Web Title: dodamarg konkan news Kankis Island support for elephant control