‘ट्रेकिंग’ अनुभवणाऱ्यांना साद घालतेय मांगेली

प्रभाकर धुरी
शुक्रवार, 28 जुलै 2017

दोडामार्ग - मांगेलीचा धबधबा पावसाचा आनंद घेत धबधब्याच्या पाण्याखाली स्नान करणाऱ्यांना जसा खुणावतो, तसाच तो जंगल भागात, आडवाटेने जात ‘ट्रेकिंग’चा अनुभव घेऊ पाहणाऱ्यांनाही साद घालतो. ओबडधोबड नैसर्गिक अनवट वाटांमधून निसर्गाची विविध रूपे डोळ्यांत साठवून ‘जंगलभ्रमंती’ ते थ्रिल अनुभवणाऱ्यांसाठी तर मांगेली आता खास आकर्षण बनत आहे.

दोडामार्ग - मांगेलीचा धबधबा पावसाचा आनंद घेत धबधब्याच्या पाण्याखाली स्नान करणाऱ्यांना जसा खुणावतो, तसाच तो जंगल भागात, आडवाटेने जात ‘ट्रेकिंग’चा अनुभव घेऊ पाहणाऱ्यांनाही साद घालतो. ओबडधोबड नैसर्गिक अनवट वाटांमधून निसर्गाची विविध रूपे डोळ्यांत साठवून ‘जंगलभ्रमंती’ ते थ्रिल अनुभवणाऱ्यांसाठी तर मांगेली आता खास आकर्षण बनत आहे.

गिरीभ्रमण, कृषी पर्यटन, समुद्र किंवा जलसफर, गड किल्ल्यांवरची भ्रमंती आदींसह पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दिसणारे वर्षा पर्यटन अशा अनेकविध संकल्पना पर्यटन क्षेत्रात रुजत आहेत. काहींना सर्व प्रकारचे पर्यटन हवे असते, तर काहींना त्यांच्या विशिष्ट आवडीचे. ज्यांना वर्षा पर्यटन अनुभवायचे असेल, निसर्ग पर्यटनाचा आस्वाद घ्यायचा असेल, स्वच्छंदपणे कड्यावरून कोसळणाऱ्या आणि काळ्याकभिन्न खडकांमधून फेसाळत जाणाऱ्या धबधब्यावर मनसोक्त भिजायचं असेल, धुक्‍याचा प्रवास आणि गार वाऱ्याचा सुखद सहवास अनुभवायचा असेल त्यांच्यासाठी मांगेली परफेक्‍ट डेस्टिनेशन आहे. डोंगरमाथ्यावरून दिसणारा आजूबाजूचा हिरवा पोपटी परिसर, ऊन आणि पावसाच्या खेळात दृष्टी खिळवून ठेवणारी निसर्गाची मनोहारी रूपे या गोष्टी पाहायच्या असतील तर मांगेलीत पोचायलाच हवे. एकदा भेट दिलेला पर्यटक पुन्हा पुन्हा तेथे पोचतो तो निसर्गाची अवखळ रूपे अनुभवण्यासाठीच. गोव्यातील अनेक कुटुंबवत्सल पर्यटक तर आपल्या कुटुंबकबिल्यासह दरवर्षी मांगेलीला भेट देतात. विशेष म्हणजे आपल्यासोबत छोट्या छोट्या मुलांनाही ते मांगेलीत आणतात. कुटुंबवत्सल पर्यटकांप्रमाणेच साहस आणि थरार अनुभवायचे वेड असणाऱ्या तरुणाईचीही काही कमी नाही. मांगेली धबधब्याजवळच्या मुख्य रस्त्यावरून धबधब्याकडे जाणारे ओबडधोबड रस्ते त्यांच्या आवडीचे आहेत. दोन रस्ते धबधब्याकडे जातात. जाताना तीव्र चढ आणि येताना तीव्र उतार. दगडांमुळे पायवाटांमध्ये नैसर्गिक पायऱ्या बनलेल्या.

उंच कडा, पायवाटेभोवती गर्द झाडी आणि समोर दिसणारा फेसाळत कड्यावरून कोसळणारा धबधबा. तरुणांना हे असेच वातावरण हवे असते जे येथे आहे. धबधब्यापर्यंत येणारा रस्ता पूर्वी मातीचा होता, तो आता डांबरी झाला आहे. निसर्ग, पर्यावरण, जुनेपण जपण्याची आंतरिक इच्छा असणारे अनेक तरुण मांगेलीत येतात. नैसर्गिकरीत्या तयार झालेली आणि धबधब्याची स्वतःची अशी ओळख कायम राहावी, अशी अपेक्षाही अनेक पर्यटक व्यक्त करतात. धबधब्याच्या परिसरातील प्लास्टिक, दारूच्या बाटल्या, केर कचरा पर्यटकांनी एका ठिकाणी व्यवस्थित टाकावा, यासाठी गावकऱ्यांनी कचराकुंडीची व्यवस्था करावी, असे पर्यटकांना वाटते.

कधी मुसळधार, तर कधी रिमझिम पाऊस, डोंगरकड्यावरून झेपावत अंगाशी सलगी करू पाहणारा गार वारा, एका कड्यावरून दुसऱ्या कड्याकडे सरकत जाणारा धुक्‍याचा काफिला, पाऊस थांबला तरी धुके आणि धबधब्यामुळे अलवारपणे भुरभुरत अंगाला भिजत सर्वांग भिजवणारे दवबिंदूसारखे तुषार, धबधब्याजवळच्या हॉटेलमधील वाफाळलेला चहा आणि गरमागरम कांदा भजी या सगळ्यांचा ‘याची देही याची डोळा’ अनुभव घ्यायचा असेल तर मांगेलीत यायलाच हवे.

चेंजिंग रुमसह सुविधा हव्यात 
निसर्गरम्य परिसर म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातील पर्यटकांना मांगेली भुरळ घालतेच; पण ज्यांना ‘ट्रेकिंग’ची आवड आहे अशांसाठीही मांगेली परफेक्‍ट स्पॉट आहे. शिवाय मांगेलीत तुम्ही बिनधास्तपणे वावरू शकता. धिंगाणा घालणाऱ्या मद्यपी व अतिउत्साही पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने त्यांची संख्या कमी झालीय. साहजिकच आपला विकेन्ड सुखासमाधानात घालविण्यासाठी येणाऱ्या कुटुंबवत्सल आणि पर्यावरणप्रेमी पर्यटकांची संख्या मांगेलीत वाढते आहे. असे असले तरी महिला पर्यटकांकडून मात्र ‘चेंजिंग रुम’सारख्या अत्यावश्‍यक सुविधा नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त होत आहे.

Web Title: dodamarg konkan news tracking mangeli