कोल्हापूरचा ‘टारझन’ ठरला अव्वल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

देवरूख - प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात आणि क्षणाक्षणाला वाढणाऱ्या उत्कंठेत, टाळ्या शिट्ट्यांच्या गजरात साखरपा येथे कोकण विभागात प्रथमच रंगलेल्या राज्यस्तरीय श्‍वान शर्यतीत कोल्हापूरच्या डायना रेसिंग क्‍लबच्या ‘टारझन’ या श्‍वानाने प्रथम क्रमांक पटकावला.

देवरूख - प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात आणि क्षणाक्षणाला वाढणाऱ्या उत्कंठेत, टाळ्या शिट्ट्यांच्या गजरात साखरपा येथे कोकण विभागात प्रथमच रंगलेल्या राज्यस्तरीय श्‍वान शर्यतीत कोल्हापूरच्या डायना रेसिंग क्‍लबच्या ‘टारझन’ या श्‍वानाने प्रथम क्रमांक पटकावला.

साखरपा - भडकंबा येथील श्री केदारलिंग मंदिर परिसरात श्री स्वामी समर्थ रेसिंग क्‍लबच्या वतीने कोकणातील पहिलीच महाराष्ट्र- पंजाब ग्रेहाँड राज्यस्तरीय श्‍वान शर्यत आयोजित करण्यात आली होती. राज्यातील विविध भागांतून १०० श्‍वान या शर्यतीत सहभागी झाले होते. सुमारे पाच हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कोकणातील या पहिल्याच स्पर्धेत कोल्हापूरकर टारझनने बाजी मारली. 

कोल्हापूर रेसिंग क्‍लबच्या टायगरने दुसरा, तर ब्लू स्टार रेसिंग क्‍लबच्या ब्लू ट्रेन श्‍वानाने स्पर्धेतील तृतीय क्रमांक पटकावला. भिंगरी रेसिंग क्‍लब कणदूरच्या सोन्याने चौथा, वाटेगाव येथील संजयराव पवार यांच्या हवा श्‍वानाने पाचवा, ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान धनाजी सोनके पंढरपूर यांच्या सायली श्‍वानाने सहावा, आरूळ येथील सचिन पाटील यांच्या बुलेटने सातवा, कासेगाव येथील शिवाजीराव जगताप यांच्या हानीने आठवा, म्हारूगडेवाडीच्या पैलवान ग्रुपच्या श्‍वानाने नववा, तर शिराळा येथील अंबामाते ग्रुपच्या श्‍वानाने दहावा क्रमांक पटकावला. विजेत्या श्‍वानाला १५ हजार रुपये व चांदीची गदा, तर दुसऱ्या क्रमांकाला ९ हजार, तृतीय क्रमांकाला ७ हजार, चौथ्या क्रमांकाला ५ हजार, पाचव्या क्रमांकाला ३ हजार, सहाव्या क्रमांकाला २ हजार, तर सात ते दहाव्या क्रमांकासाठी प्रत्येकी १ हजार आणि आकर्षक चषक देण्यात आला. स्पर्धेला स्वामी समर्थ रेसिंग क्‍लबचे अध्यक्ष प्रताप सावंत, उपाध्यक्ष गणेश वायदंडे, मनोज चव्हाण, गणेश पांचाळ, प्रशांत कांबळे, रूपेश कदम, बापू शिंदे, मंगेश कारकर, विलास कांबळे, सदा जाधव, केदारलिंग मंडळाचे पदाधिकारी, साखरपा पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

कबड्डीपटू काशिलिंग अडकेची श्‍वानासह उपस्थिती

कोकण विभागातील या पहिल्याच शर्यतीत प्रो कबड्डीमधील खेळाडू काशिलिंग अडके (सांगली) हा आपल्या ब्लॅका श्‍वानासह सहभागी झाला होता. काशिलिंगही उपस्थितांचे आकर्षण ठरला. श्‍वानांविषयी असलेले प्रेम आणि हौसेखातर आपण शर्यतीत सहभागी झाल्याचे अडके यांनी सांगितले.

Web Title: dog race competition