सेंद्रिय शेतीतून दुहेरी लाभ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

पाली : सुधागड तालुक्यातील उद्धर येथील 'इको आर्किटेक्चर' व 'इको टुरिझम' करणारे तरुण शेतकरी तुषार केळकर यांनी नुकताच आपल्या शेतात सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला. सेंद्रिय शेतीतून सकस व भरोघोस उत्पादन त्यांनी मिळविले. उत्पादन संपल्यावर शिल्लक राहिलेल्या पिकांपासून ते आता कंपोस्ट खत तयार करत आहेत. अशा प्रकारे तुषार यांनी सेंद्रिय शेतीतून दुहेरी लाभ घेवून सर्व शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा मार्ग दाखविला आहे.

पाली : सुधागड तालुक्यातील उद्धर येथील 'इको आर्किटेक्चर' व 'इको टुरिझम' करणारे तरुण शेतकरी तुषार केळकर यांनी नुकताच आपल्या शेतात सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला. सेंद्रिय शेतीतून सकस व भरोघोस उत्पादन त्यांनी मिळविले. उत्पादन संपल्यावर शिल्लक राहिलेल्या पिकांपासून ते आता कंपोस्ट खत तयार करत आहेत. अशा प्रकारे तुषार यांनी सेंद्रिय शेतीतून दुहेरी लाभ घेवून सर्व शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा मार्ग दाखविला आहे.

रासायनिक शेतीचे पर्यावरण व मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे तुषार केळकर यांनी आपल्या शेतात या वर्षी सेंद्रिय पद्धतीने भाजी व फुलांची शेती करण्याचा प्रयोग केला. त्यांनी आपल्या सेंद्रिय शेतीत शेणखत, लेंडीखत, सोनखत, कोंबडीच्या शिटांचे खत वापरले. त्याबरोबरच जिवामृत, अमृत पाणी व गोमुत्राची फवारणी केली. त्यामुळे त्यांना किडरहीत विविध भाज्या व फुलांचे चांगले व सकस उत्पादन मिळाले. सेंद्रिय शेतीचा हा पहिला प्रयोग असल्यामुळे कोणताही नफा मिळविण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. मात्र या शेतीतून त्यांचा उत्पादन खर्च निघाला. शेतात उरलेल्या वेली, झाडे व त्यांच्या अवशेषापासून तुषार आता कंपोस्ट खत बनवित आहेत. सहा महिन्यानंतर त्यांना जवळपास १५ ते २० पोती शेणखत प्राप्त होणार आहे. त्याचा वापर ते आपल्या सेंद्रिय शेतीसाठी करणार आहेत. सेंद्रिय शेतीच्या या यशस्वी प्रयोगामुळे ते आगामी काळात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती करुन त्या संदर्भातील मार्गदर्शन शेतकऱ्यांना देणार आहेत. 

रासानिक शेतीचे दुरोगामी दुष्परीणाम होतात. अशी उत्पादने खाऊन आरोग्यावर देखील त्याचे विपरीत परिणाम होतात. परिणामी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहीजे. त्यामुळे सेंद्रिय शेतीचा हा प्रयोग मी केला. सभोवताली उपलब्ध असलेल्या साधनांपासून व अतिशय वाजवी खर्चात आपल्याला सेंद्रिय शेती करता येते. त्यासाठी विविध सेंद्रिय खते व किटकनाशके बनविण्याचे शास्त्रीय ज्ञान मात्र हवे. - तुषार केळकर, सेंद्रिय शेतीचा प्रयोग करणारे शेतकरी 

इको आर्किटेक्चर' व 'इको टुरिझम'कर्ते

  • भाज्यांचे व फुलांचे भरघोष उत्पादन

आपल्या सेंद्रिय शेतीत तुषार यांनी दुधी, पडवळ, वांगी, 'टॉमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी, बिट, गाजर, मिर्ची, कडधान्य व झेंडुच्या फुलांचे भरघोस उत्पादन घेतले. आलेले उत्पादन त्यांनी गावातच स्वस्त दरात विकले. 

  • ​कसे बनवावे जिवामृत ?

दही, ताक, तूप, डाळीचे पिठ, केळ्याची साले, उसाचे चिपाडे व रस, शेण व गोमुत्र एकत्र करायचे. हे मिश्रण ३ ते ५ दिवस कुजण्यासाठी ठेवायचे. त्यानंतर जिवामृत तयार होते. दहा लिटर पाण्यात १० मिली जिवामृत टाकुन ते झाडांवर फवारावे. त्यामुळे पिकांना किड लागत नाही. पिके व झाडे तजेलदार राहतात. झाडांना चांगल्या प्रकारे श्वासोच्छवास करण्यास मदत होते. मुळांना घातल्यास वाढ जलद व उत्तम होते. जिवामृत हे पिकांच्या झाड्याच्या सदृढ वाढिसाठी टॉनिकचे काम करते असे तुषार यांनी सकाळला सांगितले. 

  • कसे बनवावे अमृतपाणी,

साधारण १० किलो शेण त्यात १ लिटर गोमूत्र व ५०० ग्रॅम गुळ यांचे मिश्रण ३० लिटर पाण्यात करायचे. हे मिश्रण ३ दिवस तसेच ठेवायचे. तीन दिवस तीन वेळा साधारण १२ वेळा घड्याळ्याच्या सुलट व विरुद्ध दिशेने ते हालवायचे.साधारण तीन दिवसांत हे अमृतपाणी तयार होते. हे अमृतपाणी पिके व झाडांवर फवारायचे किंवा मुळाशी घालायचे. पिके व झाडांच्या वाढीसाठी पोषक तसेच उत्पादन वाढीसाठी उपयुक्त असते. 

 

Web Title: Double Benefits From Organic Farming