महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्यांना सिंधुदुर्गनगरीत दुप्पट मोबदला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

सिंधुदुर्गनगरी - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील महामार्ग प्रकल्पग्रस्तांना दुप्पट मोबदला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा लवाद तथा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीतील प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.

सिंधुदुर्गनगरी - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील महामार्ग प्रकल्पग्रस्तांना दुप्पट मोबदला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा लवाद तथा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीतील प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी एकपटच मोबदला मंजूर होता. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी अपील केले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला आहे. 

मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोबदला देताना शासकीय रेडीरेकनरचा दर आणि बाजारभावाचा दर घेऊन जो जास्त दर असेल तो दर निश्‍चित करून महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रकल्पग्रस्तांना चौपट मोबदला देण्यात आला होता; मात्र ओरोस गावातून जाणाऱ्या या महामार्ग चौपदरीकरणात पश्‍चिमेकडील बाजूच्या प्रकल्पग्रस्तांना चौपट दर तर नाहीत; पण दुप्पट दर सुद्धा मंजूर केला नव्हता. याचे कारण म्हणजे ओरोसच्या पश्‍चिमेकडील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात येतात. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना सव्वालाख रुपये प्रतिगुंठा एवढाच एका गुणांकाने म्हणजे एकच पट दर निश्‍चित करून त्याप्रमाणे मोबदला मंजूर केला होता.

दरम्यान, या प्रकल्पग्रस्तांनी मोबदला वाढवून मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही केले होते; मात्र त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. अखेर महामार्ग चौपदरीकरणात जमिनी जाऊन सुद्धा योग्य मोबदला न मिळाल्याने सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी मोबदला वाढीसाठी जिल्हा लवाद तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. 

व्याजासह फायदा
अपिलावर सुनावणी होऊन महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना दोन गुणांकाने म्हणजेच दुप्पट मोबदला दिला जाणार आहे. तोही मोबदला मंजूर तारखेपासून व्याजासह. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीतील महामार्ग प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. १५ जणांच्या अपिलावर हा निर्णय दिला असून इतर महामार्ग प्रकल्पग्रस्तांनी अपील केल्यास त्यांनाही याचा फायदा होऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Double reward to land given for four track highway in Sindhudurg