भाजप तालुकाध्यक्षांच्या दुटप्पी भूमिकेने नाराजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

देवरूख - एक व्यक्‍ती एक पद या तत्त्वाचा अवलंब करायचा असा अलिखित संकेत असतानाही भाजप तालुकाध्यक्ष दीपक जाधव यांनी धामापूर गटात इच्छुक म्हणून आपलेच नाव पुढे पाठवल्याने त्यांच्याविषयी नाराजी व्यक्‍त झाली आहे. त्यांचे नाव पुढे रेटले गेल्यास भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळण्याची चिन्हे आहेत. जाधव यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी अपेक्षा नाराज गटाने व्यक्‍त केली आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळण्यास या प्रकारे जाधव कारणीभूत ठरणार की काय अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर खूश नसलेल्या मंडळींनीही डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. जाधव यांना तालुकाध्यक्षपद मिळाले त्यावेळी पक्षामध्ये ते देवरूखला देण्याचा विचार सुरू होता, मात्र हे पद आता मिळाल्यावर पुन्हा निवडणुकीसाठी आपण रिंगणात नसू, अशी ग्वाही जाधव यांनी दिल्यामुळे तडजोड म्हणून त्यांना हे पद दिले. 

यापूर्वीही काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या दिलीप गीतेंकडे तालुकाध्यक्षपद होते; मात्र त्यांची कार्यपद्धती पक्षाला पूरक नसल्याने त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर हे पद देवरूख किंवा साखरपा येथील कार्यकर्त्यांच्या गळ्यात पडणार अशी शक्‍यता असतानाच भाजपच्या एका माजी आमदारांच्या शिफारशीवरून जाधव यांची वर्णी लागली. 

दोन दिवसांपूर्वीच झालेल्या माखजन विभागाच्या बैठकीत धामापूर तर्फे संगमेश्‍वर गटातून इच्छुकांची विचारणा झाली. तेव्हा दीपक जाधव यांनी आपले नावही पुढे केले. त्यावर काही पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. 

संगमेश्‍वर तालुक्‍यातील जवळपास सर्वच गटांमध्ये भाजपने आपली ताकद वाढवली आहे. आगामी निवडणूक स्वबळावर लढवायची असल्याने भाजप प्रत्येक ठिकाणी तगडे उमेदवार देण्याची तयारी करीत आहे. अशा वेळी तालुकाध्यक्षांच्याच दुहेरी भूमिकेमुळे पदाधिकारी नाराज झाले आहेत. 

नाव पुढे केलेच कसे?
पक्षात पदाधिकारी असताना निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय जाधव यांचाच असल्याने त्यांनी आपले नाव पुढे केलेच कसे, असा प्रश्‍न कार्यकर्ते विचारू लागले आहेत. धामापूर तर्फे संगमेश्‍वर गटातून गणेश चाचेंसारखा तगडा उमेदवार पक्षाकडे असतानाही जाधव यांनी आपले नाव पुढे रेटून पक्षालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालवल्याचे मत कार्यकर्त्यांमधून व्यक्‍त होत आहे.

Web Title: The double role of displeasure BJP tahsil president