कुळांच्या शोषणावर बाबासाहेबांचा दीड तास घणाघात

मुझफ्फर खान
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

कोकणात खोतीविरुद्ध संघर्ष - चिपळुणात १९३८ ला परिषद; बहुजनांच्या न्यायासाठी प्रयत्न

कोकणात खोतीविरुद्ध संघर्ष - चिपळुणात १९३८ ला परिषद; बहुजनांच्या न्यायासाठी प्रयत्न

चिपळूण - कोकणामध्ये पूर्वापार चालत आलेली खोती पद्धत बंद करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा उभारला. त्यांच्यामुळे भूमिहीन असणारा कोकणातील कुणबी, बहुजन, अस्पृश्‍य समाज पहिल्यांदाच जमिनीचा मालक झाला. १६ मे १९३८ ला खेर्डी (ता. चिपळूण) येथील हत्ती माळावर खोती विरोधी परिषद झाली. ती सर्वत्र गाजली. या परिषदेतील बाबासाहेबांचे दीड तास भाषण झाले. कुळांच्या नेमक्‍या शोषणावर आणि त्यांच्या प्रश्‍नांवर त्यांनी सखोल विवेचनाने बोट ठेवले होते. त्यांच्या प्रज्ञेचा आणि अभ्यासाचा अनुभव कोकणला यानिमित्ताने मिळाला.

कोकणातील मराठा, ब्राह्मण आणि मुस्लिम समाजातील लोकांकडे शेकडो, हजारो एकर जमीन असे. या खोतांच्या शेतात राबण्यासाठी गावातील मागास, इतर मागास वर्गातील मंडळी असे. कुणबी लोक खोतांची शेती, तर महार लोक त्यांची गुरे-ढोरे राखणे, शेतात काम करण्याचे काम करीत. त्यांना ‘कुळे’ म्हटले जात असे. या कुळांचे तसेच त्यांची सेवाचाकरी करणाऱ्या महार मंडळींचे खोतांकडून शोषण होत असे. बारा बलुतेदार बहुजन समाज, बहुसंख्य कुणबी समाज आणि महार समाज या खोती पद्धतीने भरडला जात होता. खोताकडे सगळी यंत्रणा होती. अख्खा गाव त्याच्या ताब्यात असे. त्यामुळे ही मंडळी आवाज उठवू शकत नव्हती.

महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह व मनुस्मृतीचे दहन लढ्यांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देशभर चर्चिले जात होते. त्यांनी १९२५ पासून या प्रश्‍नाचा अभ्यास सुरू केला. १९२७ मध्ये मुंबई विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर खोतीविरोधी लढा सुरू केला. कोकणातील वेगवेगळ्या समूहांच्या परिषदा घेऊन खोतीविरुद्ध संघर्ष पुकारला. त्याचवेळी मुंबई विधिमंडळातही संसदीय मार्गाने संघर्ष चालू ठेवला. १३ व १४ एप्रिल १९२९ रोजी भारतीय बहिष्कृत समाजसेवक संघाच्या विद्यमाने चिपळूणच्या मामलेदार कचेरीजवळ रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेचे दुसरे अधिवेशन भरण्यात आले होते.

Web Title: dr. babasaheb ambedkar fight for khoti process close