'आर्टफॅक्ट’मध्ये झळकली डॉ. स्वप्नजा मोहिते यांची पेंटिंग्स

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

एक नजर

  • पणजी येथील कला अकादमीत आर्टफॅक्ट 2019 हे कलाकृतींचे प्रदर्शन 9 ते 12 मे दरम्यान. 
  • भारतातील निवडक चित्रकारांचा या प्रदर्शनात समावेश. 
  • डान्सिंग टू द ट्यून आणि एनच्यानटेड फॉरेस्ट या रत्नागिरीतील डॉ. स्वप्नजा मोहिते यांच्या कलाकृती झळकल्या या प्रदर्शनात. 

 

रत्नागिरी - पणजी येथील कला अकादमीत आर्टफॅक्ट 2019 हे कलाकृतींचे प्रदर्शन 9 ते 12 मे दरम्यान भरवण्यात आले होते.  भारतातील निवडक चित्रकारांचा या प्रदर्शनात समावेश होता. रत्नागिरीतील डॉ. स्वप्नजा मोहिते यांची डान्सिंग टू द ट्यून आणि एनच्यानटेड फॉरेस्ट या दोन कलाकृती या  प्रदर्शनात झळकल्या. फ्लुइड पेंटिंग प्रकारातील ही पेंटिंग्स त्यातल्या रंगसंगती आणि कलाविष्कार यामुळे इतर कलाप्रकारात वेगळी जाणवतात, असे मत यावेळी जाणकारांनी व्यक्त केले.

अ‍ॅक्रेलिक, अल्कोहोल इंक्स आणि रेझीन या माध्यमातून काम करणार्‍या डॉ. मोहिते यांनी यावेळी अल्कोहोल इंक्स या अतिशय वेगळ्या आणि नवीन अशा माध्यमातून पेंटिंग करण्याचे प्रात्यक्षिकही सादर केले. या वेळी रसिकांनीही या इंक्स वापरून पेंटिंग करण्याचा आनंद घेतला. या चित्र प्रदर्शनास प्रसिद्ध अभिनेते सुमित राघवन यांनी भेट दिली. तेव्हा त्यांना आपले अल्कोहोल इंक्समधील एक पेंटिंग भेट देण्याची संधी डॉ. मोहिते यांना मिळाली. तो एक खास आनंद होता असे त्यांनी सांगितले.

क्युरेटर आणि चित्रकर्ती श्रीमती अल्पना लेले यांनी आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन विख्यात चित्रकार सद्गुरु चेंदवणकर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रकर्ती विनिता चेंदवणकर यांच्या हस्ते झाले.

कला अकादमीमध्ये आपली पेंटिंग्स प्रदर्शित करणे हा एक विशेष अनुभव होता असे डॉ. स्वप्नजा मोहिते म्हणाल्या. आजपर्यंत डॉ. मोहिते यांची पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे चित्र प्रदर्शने झाली आहेत. इटलीतील नेपल्स येथील कॅम म्युझियममध्ये चौथ्या सर्व्हावल आर्ट फेस्टिवलसाठी जुलैमध्ये होत आहे. या प्रदर्शनात त्यांच्या टर्ब्युलन्स या पेंटिंगची निवड झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Swapnaja Mohite paintings Art fact 2019 in Goa