‘आनंदवन’ बंद होईल तो दिवस आनंदाचा - डॉ. विकास आमटे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

कणकवली - बरे झाल्यानंतरही  कुष्ठरोग्यांना समाज स्वीकारत नाही. हे कुष्ठरोगी पुन्हा आनंदवनमध्ये येतात. ही परिस्थिती बदलायला हवी. समाजाची या रोग्यांकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी, असे जेव्हा होईल तेव्हा आनंदवन बंद होईल, तेव्हाचा आनंद विलक्षण असेल, असे मत आनंदवनाचे संचालक डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केले.

कणकवली - बरे झाल्यानंतरही  कुष्ठरोग्यांना समाज स्वीकारत नाही. हे कुष्ठरोगी पुन्हा आनंदवनमध्ये येतात. ही परिस्थिती बदलायला हवी. समाजाची या रोग्यांकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी, असे जेव्हा होईल तेव्हा आनंदवन बंद होईल, तेव्हाचा आनंद विलक्षण असेल, असे मत आनंदवनाचे संचालक डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केले.

स्वरानंदवन या कार्यक्रमाच्या निमित्ताने कणकवली आलेल्या डॉ. विकास आमटे यांनी गोपुरी आश्रमात काही काळ विश्राम केला. या वेळी त्यांनी युरेका सायन्स क्‍लबच्या विद्यार्थ्यांशी, पालकांशी संवाद साधला. गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रसाद घाणेकर, युरेका क्‍लबच्या सुषमा केणी उपस्थित होते.

डॉ. विकास आमटे म्हणाले, ‘‘वैद्यकीय क्षेत्रात प्रगती, संशोधन खूप झाले. याचे चांगले परिणाम कुष्ठरोगाच्या क्षेत्रात दिसले. परंतु समाजप्रबोधन करण्यास आम्ही सर्वजण कार्यकर्ते कमी पडलो. कुष्ठरोग्यांबाबत समाज अजूनही शिक्षित झालेला नाही. त्यामुळे आजही समाजाकडून कुष्ठरुग्णांना अन्यायाची वागणूक दिली जातेय. आनंदवन हे पर्यटनस्थळ नाही तर ही जगातली सर्वात वाईट जागा आहे. इथली माणसं आनंदवनात नव्हे तर त्यांच्या हक्‍काच्या घरात आणि हक्‍काच्या माणसांमध्ये रहायला हवीत. भविष्यात एकाही आनंदवनाची निर्मिती होऊ नये, एवढया निकोप समाजाची आज आवश्‍यकता आहे.’’

डॉ. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी अंधशाळा, मूक-कर्णबधिर शाळा, पाच हजाराहून अधिक विद्यार्थासाठी विज्ञान, कला, वाणिज्य महाविद्यालय, कुष्ठरोग्यांसाठी वसाहत, सुसज्ज हॉस्पिटल, औद्योगिक वसाहत काढली. आनंदवनात कोकण, बंगाल, ओरिसा, बिहार आणि अन्य भागातून अनेक कुष्ठरोगी वास्तव्यास आले आणि या सर्वांना बाबांनी आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवले.

आनंदवनातील वसाहतीत १४९ उद्योग
सध्या महारोगी सेवा समितीच्या २८ संस्था असून, आनंदवनातील औद्योगिक वसाहतीत सुमारे १४९ विविध उद्योग चालवले जातात. कुष्ठरोग्यांची तयार केलेली ३ चाकी सायकल, कपडे, शुभेच्छा कार्ड, जोडे, येथील ५० हजार लिटर निघणारे दूध यांना खूप मागणी आहे. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर कोणाला भेट वस्तू देताना आनंदवनात तयार झालेल्या वस्तू देत असतो, असेही डॉ. विकास आमटे यांनी अभिमानाने सांगितले.

Web Title: dr. vikas amate discussion with student