ड्रॅगन फ्रूट फुलले कोकणातील पूर्णगड कातळावर

ड्रॅगन फ्रूट फुलले कोकणातील पूर्णगड कातळावर

पावस - पूर्णगडच्या कातळावर ड्रॅगन फ्रूट लागवडीचा प्रयोग डॉ. श्रीराम फडके यांनी यशस्वी केला आहे. परिघाबाहेर जाऊन गेल्या काही वर्षांत शेतीत विविध प्रयोग सुरू आहेत. पूर्णगडमधील यश त्यापैकी एक.

डॉ. श्रीराम फडके यांना शेतीची आवड. प्रॅक्‍टिस थांबवल्यानंतर त्यांनी शेतीत वेगळे प्रयोग करायचे ठरवले. आंबा, काजूबरोबरच त्यांच्या मुलाने बाजारात मागणी असणाऱ्या एक्‍झॉटिक फळांच्या लागवडीचा पर्याय सुचवला. मोठी गुंतवणूक करून प्रयोग यशस्वी होईल का, याची खात्री फडके यांना नव्हती. तरीही डॉ. फडकेंनी धोका पत्करला. थायलंड, व्हिएतनाम किंवा श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फळांची लागवड होते. रायगडमधून २०१५ मध्ये त्यांनी रोपे आणली. दोन एकरवर ६०० हून अधिक रोपांची लागवड केली. सिमेंटच्या एका खांबावर चार वेलांची लागवड होते. निवडुंगासारख्या दिसणाऱ्या या वेलाला साधारणपणे जून ते ऑक्‍टोबर दरम्यान फळे येतात. त्याला भरपूर पाऊस  चालत नाही. 

एका झाडापासून तयार वेलींना सहा ते सात फळे येतात. रत्नागिरीच्या स्थानिक बाजारात त्याची विक्री करतो. ७० ते १०० रुपये किलो इतका दर मिळतो. ड्रॅगन फळांमुळे प्लेटलेटस्‌ वाढविण्यासाठी चांगला उपयोग होतो.
- डॉ. श्रीराम फडके,
पूर्णगड

पहिल्या वर्षी त्यांना एखाददुसरेच फळ मिळाले. दुसऱ्या वर्षी १५ ते २० फळे मिळाली. यावर्षी मात्र त्यांना सुमारे २०० फळे मिळाली. ही फळे रंगाने लाल, पांढरट असतात. डॉ. फडके यांनी लाल जात निवडली आहे. एका एकरला सुमारे पाच लाखाचा खर्च येतो. या फळांवर लाल मुंग्या आणि बुरशी पडते. त्यामुळे फवारणी करावी लागते. प्रायोगिक तत्त्वावर असल्याने फळापासून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत अद्याप ठोस निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे फडके यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com