जाळ्यातील अजगराला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

पाली - 19 डिसेंबरची संध्याकाळ... उद्धर गावातील नदीत मासेमारी करणाऱ्या ग्रामस्थाला जाळे अचानक खूपच जड वाटू लागले. ते वर खेचण्यासाठी बराच वेळ जोर लावून उपयोग झाला नाही... अचानक जाळ्याजवळ सापाचे तोंड बाहेर आले!

पाली - 19 डिसेंबरची संध्याकाळ... उद्धर गावातील नदीत मासेमारी करणाऱ्या ग्रामस्थाला जाळे अचानक खूपच जड वाटू लागले. ते वर खेचण्यासाठी बराच वेळ जोर लावून उपयोग झाला नाही... अचानक जाळ्याजवळ सापाचे तोंड बाहेर आले!

जाळे तसेच ठेवून या ग्रामस्थाने घराकडे धूम ठोकली. गावातील सर्पमित्र तुषार केळकर यांना ही घटना समजताच त्यांनी मित्र दीपेश केदारी व मासेमारीस गेलेल्या ग्रामस्थाच्या मुलासोबत रात्री आठच्या सुमारास नदीकडे धाव घेतली. त्यांनी जाळे वर काढण्याचा प्रयत्न केला. पाहतात तो काय, एक भला मोठा अजगर जाळ्यात अडकून सुटकेचा प्रयत्न करत होता. हे लक्षात येताच केळकर अशा काळोखात व भर थंडीत नदीत उतरले. जाळ्यातून अजगराची सुटका करण्याचा प्रयत्न करू लागले. आढेवेढे घेतल्याने हे जाळे अजगराभोवती गुंडाळे गेले होते. अजगराला सांभाळून जाळे सोडविणे अवघड जात होते. मग केदारीही नदीत उतरला. त्याने अजगराभोवतीचे हे जाळे कापून काढले. पाऊण तासाच्या थरारानंतर अजगराची सुटका झाली. काठावर उभे राहून काही आदिवासी हा रोमहर्षक प्रसंग पाहत होते. अजगरास सोडविण्यास आणखी थोडा उशीर झाला असता तर कदाचित तो पाण्यात बुडून मृत्यू पावला असता, असे केळकर यांनी सांगितले. या आधी अनेकदा त्यांनी विविध प्रकारच्या सापांची सुटका केली आहे. या नदीकिनारीच त्यांचे शेत आहे.

अजगराला काही इजा झाली आहे का? त्याच्या अंगावर काही जीवजंतू व परपोषी जंतू आहेत का? हे पाहण्यासाठी त्याला रात्री केळकर यांच्या घरी ठेवण्यात आले. त्याची तपासणी करून दुसऱ्या दिवशी (ता. 20) नदीकिनारी सोडण्यात आले. रस्त्यावर सापडलेल्या एका कासवालाही सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. या वेळी अंनिसच्या पाली-सुधागड शाखेचे कार्याध्यक्ष अमित निंबाळकर उपस्थित होते.

अजगरासंबधी स्थानिकांच्या मनात अनेक अंधश्रद्धा व गैरसमज आहे. त्याचे तेल सांधेदुखीवर आणि जखम बरी होण्यासाठी उपयोगी असते, असा गैरसमज आहे. त्यामुळे अनेक जण अजगराला मारतात. असे कोणी करू नये. कोणताही साप घरात किंवा घराजवळ दिसल्यास जवळच्या सर्पमित्रास बोलवावे. साप पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
- तुषार केळकर, सर्पमित्र

Web Title: dragon to leave