सांडपाण्याची समस्या ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

दापोली - शहरात वाढत्या रहिवासी इमारतींच्या संख्येने सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. नगरपंचायतीला नागरिकांना आरोग्य, स्वच्छता, पाणी यांसारख्या मूलभूत गरजा पुरवताना अडचणी येत आहेत. रहिवासी इमारती वाढल्याने सांडपाणी वाहून नेण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा नाही. त्यामुळे रस्त्यावरील उघड्या गटारातून सांडपाणी चोवीस तास वाहत आहे. 

दापोली - शहरात वाढत्या रहिवासी इमारतींच्या संख्येने सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. नगरपंचायतीला नागरिकांना आरोग्य, स्वच्छता, पाणी यांसारख्या मूलभूत गरजा पुरवताना अडचणी येत आहेत. रहिवासी इमारती वाढल्याने सांडपाणी वाहून नेण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा नाही. त्यामुळे रस्त्यावरील उघड्या गटारातून सांडपाणी चोवीस तास वाहत आहे. 

सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता हे सांडपाणी रहिवासी इमारती, हॉटेल यामधून थेट गटारात सोडण्यात आल्याने शहरात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. याचबरोबर शहरातील सांडपाणी वाहून नेणारी सर्व गटारे जोग नदीत सोडण्यात आल्यामुळे नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. नवीन इमारतींना परवानगी देताना सांडपाणी प्रक्रिया व व्यवस्थापन करण्याची अट अंतर्भूत असतानाही नवीन इमारतीमधून सांडपाणी गटारात सोडण्यात येत असल्याचे दृश्‍य शहरात काही भागांत दिसून येते. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला सरासरी एका सदनिकेला केवळ सहा हजार रुपये खर्च येतो. सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याने शहरातील एकमेव नदी दूषित होत आहे. इमारतीच्या आवारात सांडपाणी पुन:प्रक्रिया प्रकल्प न उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना इमारत पूर्णत्वाचा दाखला दिला जात असल्याने सांडपाण्याची समस्या निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. 

नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर गेल्या दहा वर्षांत दापोली शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तालुक्‍यातील ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे मुलांच्या शिक्षणासाठी दापोलीत राहण्यात पसंती देतात. नोकरीनिमित्त कुटुंबप्रमुख परदेशात असलेल्या कुटुंबांची संख्या तालुक्‍यात मोठी असून कुटुंबातील उर्वरित सदस्य शहर म्हणून दापोलीत राहण्यास उत्सुक असतात. या सर्व सामाजिक परिस्थितीचा परिणाम दापोली शहराच्या लोकसंख्येवर दिसून येतो. वाढत्या लोकसंख्येची निवासी गरज पुरविण्यासाठी शहरात निवासी इमारतींच्या बांधकामांची संख्या वाढली आहे. जुन्या कौलारू माडीची घरे पाडून त्याजागी तीन-चार मजली इमारती उभ्या राहत आहेत. निवासी व वाणिज्यिक संकुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याचा ताण सार्वजनिक सुविधांवर पडत आहे. 

गृहप्रकल्पाच्या खर्चाच्या तुलनेत अत्यल्प खर्च असलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे रहिवाशांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यावसायिकाने असा प्रकल्प उभारला पाहिजे.
- अक्षय फाटक, बांधकाम व्यावसायिक, दापोली.

Web Title: dranage water issue