औषध दुकानदारांचा 28 सप्टेंबरला बंद

 औषध दुकानदारांचा 28 सप्टेंबरला बंद

रत्नागिरी - औषधांच्या ऑनलाइन विक्रीला ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने विरोध दर्शवला आहे. ऑनलाइन कंपन्या सर्रासपणे औषध कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करत आहेत. अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत. याच्या निषेधार्थ भारतातील सर्व केमिस्टस् दुकाने 28 सप्टेंबरला एक दिवसीय बंद पुकारला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील औषध दुकानेसुद्धा पूर्ण बंद राहणार आहेत.

यासंदर्भात रत्नागिरी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेष शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. केंद्र सरकारने इंटरनेटद्वारे औषधांची विक्री करण्याचा दिलेला कोणताही आदेश किंवा ई फार्मसीज्ना कोणत्याही स्वरूपात कार्य करण्याची दिलेली मुभा यांचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारला आहे. ऑनलाइन विक्रीमुळे केमिस्ट, ड्रगिस्ट दुकानदारांचे नुकसान होणार असून ग्राहकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होऊ शकतो. यापूर्वी केंद्र सरकार व संबंधित सर्व अधिकार्‍यांसोबत चर्चा करूनही योग्य उत्तर मिळालेले नाही. दोन वेळा भारत बंदचे आयोजनही केले. परंतु सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. तसेच अनधिकृतपणे वेबसाईट चालवून औषध विक्रीचे प्रकारही वाढले आहेत. याचा विपरित परिणाम औषध घेणार्‍या रुग्णांवरही होऊ शकतो, असा दावा संघटनेने केला आहे.

केंद्र सरकार डीपीसीओसोबतच्या सहयोगाने औषधांच्या किंमती नियमन व नियंत्रित करतात. एकूण व्यापार मार्जिन रिटेलरसाठी 16 टक्के, होलसेलर्ससाठी 10 टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे. मात्र ऑनलाइन कंपन्या 50 ते 70 टक्क्यांपर्यंत सवलत देत आहेत. यामुळे छोट्या दुकानदारांवर आर्थिक संकट कोसळणार आहेत. त्यामुळे आंदोलन करण्याशिवाय संघटनेकडे पर्याय नाही, असे संघटनेते म्हणणे आहे.

ऑनलाइन कंपन्यांविरोधात आक्षेप

  • ऑनलाइन कंपन्या कायद्यांतर्गत कोणत्याही जबाबदारीशिवाय काम करत आहेत. औषधांचे सत्यापन केल्याशिवाय मागणी मंजूर करत आहेत.
  • एमटीपी किट्स, सिल्डेनिफल, टॅडलिफल, कोडेनसारखी गुंगी आणणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ला न घेता विकण्यात आली आहेत.
  • स्त्रीरोग, मानसोपचारतज्ज्ञ यांसारख्या विशेषीकृत डॉक्टरांनी लिहून दिल्यानंतरच औषधे विक्री करायची असतात. मात्र ही औषधे ऑनलाइन कंपन्या विक्री करत आहेत.
  • जुन्या किवा बनावट प्रिस्क्रिप्शनवरून औषधांची विक्री केली जाते.
  • तपासणी न करता बनावट इ प्रिस्क्रीप्शन तयार केले जाते. या कंपन्या उघडपणे जाहिराती करत आहेत, असे आक्षेप संघटनेने घेतले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com